आवश्यक बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक बातम्या
आवश्यक बातम्या

आवश्यक बातम्या

sakal_logo
By

२०९८२
‘स्पंदन’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कोल्हापूर, ता. ११ ः श्रीनिवास संगोराम यांच्या कवितांमधून माणूस अध्यात्म, समाज याविषयी आणि स्वतःच्या वयाची सत्तरी ओलांडूनही तारुण्यातले प्रेमही सापडते. विविधांगी विषयांना स्पर्श करणाऱ्या सुमारे अडीच हजारांहून अधिक कवितांपैकी मोजक्या ९० कवितांचा ‘स्पंदन’ हा काव्यसंग्रह तरुणांपासून सर्वांनाच जगाची दिशा आणि आनंदही देईल, असे मत प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी व्यक्त केले. कवी ग्रेस आणि जगदिश खेबुडकर यांच्या जन्मदिनी प्रोबस ज्येष्ठ नागरिक संघ आणि डॉ. अरगडे ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘स्पंदन’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
संगोराम यांच्या शरीराला पार्किन्सनची व्याधी जडल्याने त्यांचे संपूर्ण शरीर स्थिर राहत नसतानाही गेल्या २० वर्षांत सुमारे अडीच हजारांहून अधिक कविता, एक हजारपेक्षा अधिक गझल्स त्यांनी लिहून संगीतबद्धही केल्या आहेत. पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत सतत संगीत या विषयात रमणारे संगोराम हे केवळ व्यक्तिमत्त्व नसून एक अद्‍भुत चमत्कार आहे, असेही डॉ. पोतदार म्हणाले.
माजी शिक्षण उपसंचालक अरविंद पोतदार यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. विकास बेसादे, सुरेश पाटील, रमा संगोराम, प्रा. अरविंद देशपांडे, आर. एन. हडकर आदी उपस्थित होते. गुरुनाथ हेलेकर यांनी आभार मानले.
...............
२०९८१
नेहरूनगर विद्यामंदिरात सीड बॉल कार्यशाळा
नेहरूनगर, ता. ११ ः येथील महापालिकेच्या नेहरूनगर विद्यामंदिर शाळेत सीड बॉल कार्यशाळा झाली. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. पर्यावरण व बागा अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी सीड बॉल उपक्रमाचे महत्त्व, आवश्यकता व सीड बॉल रुजवणूक याविषयी माहिती दिली.
अनिकेत जाधव यांनी सीड बॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांनी स्वागत केले. संजय पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संगोपन करणे आवश्यक असल्याचे सांगून सीड बॉल उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त रोपांची रुजवणूक करूया, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक शहाजी घोरपडे, वहिदा मोमिन, जयश्री आवळे, सरिता कांबळे, अमृता खुडे, शुभांगी गुरव व पाचवी ते सातवीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. वेदिका माळवी हिने आभार मानले.
.........
फक्त फोटो- २०९८०
............
२१०९८

जनस्वास्थ्य दक्षता समितीचे
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
आर. के. नगर, ता. ११ ः येथील जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर नुकतेच झाले. डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमधील निवडक २८ विद्यार्थी व विद्यार्थिनींना आरोग्य, पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कृतिशील प्रशिक्षण देण्यात आले.
शेंडा पार्क येथे पहिल्या दिवशी चेतना विकास मंदिर शाळेचे कार्याध्यक्ष पवन खेबुडकर यांनी संवाद साधला. अपंगांचे प्रश्न, गतिमंद, ऑटिझम, सेरेबल पाल्सीबाबत पालक व शिक्षक पर्यायाने सामाजिक बांधिलकीची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल चव्हाण यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कमालीची अंधश्रद्धा असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महत्त्व विशद केले. रसिया पडळकर यांनी पथनाट्य संहिता आणि पथनाट्याचा साहित्यिक मागोवा घेतला. जनस्वास्थ्य समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी पर्यावरणपूरक घर आणि जीवनशैली काळाची गरज हे स्वानुभवातून पटवून दिले. तारुण्याच्या उंबरठ्यावर या विषयावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निरुपमा सखदेव यांनी संवाद साधला. प्रा. अनिल कवडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच मुलींचे शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, आंतरजातीय विवाह या विषयावर मार्गदर्शन केले. इतिहास संशोधक, माजी प्राचार्य डॉ. विलास पोवार यांनी शाहू महाराज आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर इतिहासाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. वैभवी हल्लीसगर, वैष्णवी पोतदार, सिद्धेश कांबळे, समृद्धी आंबले, गार्गी कुरबेटकर यांनी संयोजन केले.
...........

२०९८३
राजर्षी शाहूंनी हत्तींसाठी राखून ठेवलेल्या शिवरण्याला भेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः येथील निसर्गमित्र परिवारातर्फे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू महाराजांनी वन्य हत्तींसाठी मुडागड येथे राखून ठेवलेल्या शिवारण्याला भेट दिली. गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या सुमारे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
अभ्यास सहलीमध्ये सह्याद्रीच्या परिसरातील जैवविविधता, भौगोलिक रचना, डोंगर दऱ्या, पाणवठे, झरे, गवताळ कुरणे, नदीची परिसंस्था, माती, दगड, शेती, धनगर वाडे परिसरातील परसबागा व स्थानिकांशी चर्चा इत्यादींविषयी माहिती देण्यात आली. तसेच जंगल भ्रमंती करताना पांढरा कुडा, गेळा, सुरंगी, टेंटू, भोकर, हिरडा, बेहडा, नाना, बहावा, अंजनी, करंबळ, शिवण, कुंभा, वारस, कुंकूफळ इत्यादी वृक्ष, तर वाकेरी, धायटी, दालचिनी, शिकेकाई, करवंद, मिरी, ऊक्षी, हरदल, मॉस, अळू, पात्री, घोळ, घोटावेल, गोमाटी, घोरकंद इत्यादी रानभाज्या, झुडपे, वेली व गवताळ कुरणे आढळली. हरणटोळ, बेडूक, मासे, खेकडे, वन्यप्राण्यांचे ठसे, विविध फुलपाखरे, पक्ष्यांची व कीटक-मुंग्यांची घरटी अशा अनेक वन्यजीवांचे निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
आधुनिक जीपीएस तंत्राचा वापर करून सर्व नैसर्गिक रचनांच्या नोंदी घेतल्या. विद्यार्थ्यांना निसर्गमित्रचे अनिल चौगुले, पराग केमकर, प्रा. संजय मेणशी, प्रा. नीलेश सुसवरे यांनी मार्गदर्शन केले. मुडागड येथे गडाची स्वच्छता केली. मोहिमेचे संयोजन जमीर मुश्रीफ, महेश कांबळे, गेनू गावडे यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, प्राचार्य पी. के. पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

चौकट
कुड्याची भाजीची आठवण
स्थानिक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणींचे कथन केले. शाहू महाराज आडूर ते पोर्ले या परिसरात भटकंती करत असताना शेतामध्ये एका आजीबाईने स्वयंपाकामध्ये कुड्याची भाजी केली होती. महाराजांना या भाजीची चव फारच आवडली व खूश होऊन महाराजांनी आजीबाईंना खणाच्या आकाराची जमीन बक्षीस म्हणून बहाल केली होती, अशी आठवण आक्काताई चौगुले यांनी सांगितली. पडसाळी धरण भेटीने या अभ्यास सहलीची सांगता झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57178 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top