
बीओटी प्रकल्पांना चालना मिळणार
जिल्हा परिषदेतून...
बीओटी प्रकल्पांना चालना मिळणार
प्रशासक संजयसिंह चव्हाण; मुंबईतील बैठक मोक्याच्या जागांबाबत सकारात्मक चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : जिल्हा परिषदेच्या अनेक मोक्याच्या जागांचा विकास करण्यासाठी बांधा, वापरा व हस्तांतरित करा या धोरणाचा वापर करण्याबाबत मंत्रालयात सकारात्मक चर्चा झाली. पुढील आठवड्यात निर्णय होऊन भाऊसिंगजी रोड इमारतीसह इतर प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केला. मंत्रालयात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर श्री. चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली.
जिल्हा परिषदेचे उत्पन्न कमी होत चालले आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीचे पर्याय शोधले जात आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागांचा विकास करणे आवश्यक आहे. याबाबतचे सर्वेक्षणही केले आहे. त्यानुसार निवडक जागांचा विकास केला जाणार आहे. महापालिकेच्या शेजारीच जिल्हा परिषदेची जागा आहे. या ठिकाणी व्यावसायिक इमारत बांधण्याचे नियोजन आहे. अशी इमारत बांधण्यासाठी आवश्यक परवानगी, कर भरणा केला आहे. ही इमारत बांधण्यासाठी साधारणपणे ८ ते १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. यावर आज चर्चा होऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बीओटी धोरणाबाबत सूचना केल्या आहेत. त्याबाबतचे आदेश लवकरच प्राप्त होतील, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
शिक्षक पदोन्नतीबाबत पुन्हा चर्चा
प्राथमिक शिक्षण विभागाच्या ३६२ शिक्षकांना विज्ञान शिक्षक म्हणून पदोन्नती दिली आहे. मात्र दुर्गम भागात जाण्यास शिक्षक तयार नसल्याने तसेच ऑनलाईन बदल्या होणार असल्याने पदोन्नतीचे आदेश दिलेले नाहीत. याबाबत शिक्षक मंत्री मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. मात्र शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना या बैठकीस बोलवले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57261 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..