
बियाणे दर वाढले, खरीप महागणार
बियाणे दर वाढले, खरीप महागणार
सोयाबीनसह भातही भडकला; किलोमागे १५ ते २५ रुपयांची तेजी
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : खरीप हंगाम जवळ येवू लागला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मॉन्सूनचे वेध लागले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्यादृष्टीने यंदाचा खरीप हंगाम महागडा ठरणार आहे. सोयाबीन किलोमागे १५ ते २५ तर भात बियाणांत किलोमागे ५ ते १० रूपयांची वाढ झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आता शेतकरी अधिकाधिक घरगुती बियाणे वापराकडे वळण्याची शक्यता आहे.
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सून केरळला धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे उरकण्यात व्यस्त आहे. तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असते. त्यानंतर भात आणि भुईमूगाचा क्रमांक लागतो. सोयाबीन बियाणांचा दर गतवर्षी दर्जानुसार ११० ते १५० रुपये प्रति किलो असा होता. तो यंदा १३५ पासून १७५ रुपयापर्यंत पोहचला आहे. घरगुती सोयाबीन बियाणे वापराचे प्रबोधन कृषी विभाग तालुक्यात करीत आहे. यंदा किमान ६० टक्के बियाणे घरातील वापरण्याचे उद्दीष्ट खात्याने ठेवले आहे. त्यादृष्टीने उगवण क्षमता, बीज प्रक्रियेची प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत. आता सोयाबीन बियाणांचे दर अधिक वाढल्याने अधिकाधिक शेतकरी घरगुती बियाणे वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भात बियाणांचे दरसुद्धा किलोमागे ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत. घरातील भात बियाणे वापरण्याचे केवळ ३५ टक्के इतके आहे. ६५ टक्के शेतकरी भात बियाणे बाजारातून विकत आणतात. यामुळे भात उत्पादकांना यंदाचा खरीप हंगाम अधिक महागडा ठरणार आहे. खरीपासाठी डीएपी खताची मागणी अधिक असते. प्रत्येक बियाणांच्या पेरणीवेळी या खताची गरज असते. परतुं आतापासूनच बाजारात या खताची टंचाई जाणवत आहे. पेरणीवेळी या खताचा मुबलक पुरवठा व्हावा अशी मागणी शेतकर्यांची आहे. पावसाळ्यात उसासाठी युरियाची मोठी गरज लागते. या खताची तर वर्षभर टंचाई आहे. कंपन्याकडून होणार्या लिकींगमुळे दुकानदारही युरिया ठेवण्याकडे घाबरत आहेत. वाहतूक खर्च, हमाली हा सारा खर्च जाता या खतातून काहीच पदरात पडत नसल्याचे त्याचे मुख्य कारण आहे. तसेच खर्चासह एमआरपीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास लागलीच तक्रार केली जाते. यामुळे दुकानदारांची अवस्था इकडे आड, तिकडे विहिर अशी झाली आहे.
---------------
चौकट...
बियाणे दरावर नियंत्रण हवे
बियाणे निर्मितीच्या शेकडो कंपन्या बाजारात आहेत. महाबीजसुद्धा बियाणांचा पुरवठा करते. काही खासगी कंपन्या शेतकर्यांकडून सोयाबीन बियाणे ७० ते ९० रुपये किलोने खरेदी करतात. परंतु, तेच बियाणे प्रक्रिया करून बाजारात आणताना कंपन्या त्याचे दर दिडशे रुपयांवर नेतात. भाताचेही असेच आहे. यामुळे शेतकर्यांचेच बियाणे त्यांनाच दुप्पट दराने खरेदी करण्याची वेळ येते. म्हणूनच आता शासनाने खताप्रमाणेच बियाणे दरावरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
---------------
प्रमुख खरीप पिके व बियाणांची गरज
खरीप पिक*क्षेत्र हेक्टरमध्ये*बियाणे क्विंटलमध्ये
सोयाबीन*१४५००*३४८०
भात*६९७४*१५८६.६०
भुईमूग*६०००*२४०
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57273 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..