
धोकादायक इमारतींबाबत खबरदारी
धोकादायक इमारतींबाबत खबरदारी
इचलकरंजी पालिका करणार सर्व्हे; ठोस उपाययोजना करणार
इचलकरंजी, ता. ११ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतींबाबत आतापासून पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी लवकरच अशा धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात येणार आहे. विशेष करून पूरग्रस्त भागातील अशा इमारती पावसाळ्यात अधिक धोकादायक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे या परिसरात जीवीत अथवा वित्त हानी होऊ नये, यासाठी धोकादायक इमारतींबाबत आवश्यक त्या ठोस उपाय योजना करण्यावर पालिकाकेडून भर दिला जाणार आहे.
दरवर्षी पावसाळा येण्यापूर्वी पालिकेकडून धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला जातो. पण गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीला महापूर आला होता. त्यामुळे या प्रक्रियेला यंदा विशेष महत्त्व असणार आहे. गेल्यावर्षी गावभाग तसेच नदीकडील नागरी वस्ती महापुराच्या पाण्याखाली आली होती. किमान आठ दिवस नागरी वस्तीत महापुराचे पाणी होते. यामुळे अनेक जुन्या इमारती कमकुवत झाल्याची शक्यता आहेत. त्यामुळे या इमारती पावसाळ्यात धोकादायक बनू शकतात. यापूर्वीही गावभागात अशीच मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती.
या पार्श्वभूमीवर पालिकेने धोकादायक इमारतींबाबत संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी इमारतीचा पूर्ण अथवा काही भाग कोसळण्याची शक्यता असल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. यामध्ये अशा धोकादायक इमारती पाडून टाकाव्यात अथवा धोकादायक भाग दुरुस्त करुन मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. लवकरच पालिकेच्या बांधकाम विभागाकडून याबाबतचा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यामध्ये धोकादायक असणा-या इमारतींच्या मालकांना नोटिसा दिल्या जाणार आहेत. प्रसंगी पालिकेच्या यंत्रणेकडून अशा इमारतींबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
----------
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पंचगंगा नदीस आलेल्या महापुरामुळे नदीकाठ परिसरातील बहुतांशी वसाहती पूरग्रस्त झाल्या होत्या. यंदाही अशी परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन जीवित अथवा वित्त हानी होऊ नये, यासाठी धोकादायक इमारतींबाबत संबंधितांनी पालिका प्रशासनाच्या सूचनेप्रणाणे कार्यवाही करावी.
-डॉ. प्रदीप ठेंगल, मुख्याधिकारी, इचलकरंजी नगरपरिषद
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57278 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..