
प्रशासनातील कच्चे दुवे सांधणार कोण
प्रशासनातील कच्चे दुवे सांधणार कोण
आजरा कारखाना चोरी प्रकरण; मुख्य सूत्रधार उघडण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ११ : आजरा कारखान्यातील बेरिंग चोरी प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या या प्रकरणावर चौकशी समितीच्या अहवालानंतर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणी समितीने हलगर्जी, निष्काळजी, बेजबाबदारपणा दाखविल्याबद्दल प्रशासनातील अधिकारी व सुरक्षा विभागातील कर्मचारी अशा ३४ जणांवर ठपका ठेवल्याने प्रशासनातील कच्चे दुवे उघड झाले आहेत. पण केवळ त्यांच्यावरच दोषारोप करून चालणार नाही. या प्रकरणाच्या मुळात जावून चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार उघढ होण्याची गरज आहे. चौकशी समितीने स्क्रॅप विक्रीतून चोरी झाल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाला सहकार्य केल्यास चोरीचा छडा लागण्यास वेळ लागणार नाही.
आजरा साखर कारखाना हा तालुक्याची शिखर संस्था आहे. या संस्थेमध्ये चोरी झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यातून संभ्रमाचे वातावरण आहे. हे वातावरण दुर करण्यासाठी चोरीचे प्रकरण उघड होण्याची गरज आहे. या पाठीमागील खरे सूत्रधार पुढे येणे गरजेचे असल्याचे कारखाना प्रशासन, सभासद. शेतकरी व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपुर्ण तपास पोलिसांकडून होणे गरजेचे आहे. आजरा कारखाना सन २०१८-१९ व २०११९-२० चा हंगाम बंद होता. या कालावधीत स्क्रॅप विक्रीसाठी ठेवले होते. निविदेची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केल्यावर स्क्रॅपचे साहित्य एकत्रीत गोळा करून कारखान्याच्या इमारतीमध्ये ठेवले होते. त्या साहित्याच्या बाजूलाच बेरिंग दुरुस्तीसाठी ठेवल्याचे अहवालात नमुद केले आहे. त्यामुळे स्क्रॅप विक्रीतून सदर बेरिंग्जची चोरीला गेल्याचा संशय चौकशी समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे स्क्रॅप कोणाला विकले या पासून ते इथ पर्यंत चौकशी होणे गरजेचे आहे.
आजरा कारखाना जिल्हा बॅंकेच्या ताब्यातून परत संचालक मंडळाकडे चालवण्यास आल्यावर गतवर्षी चोरीचा प्रकारसमोर आला. कारखान्यातील २७० किलोच्या चार व ९२ किलोच्या दोन अशा सहा बेअरिंग चोरीला गेल्या आहेत. याबाबत ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालकांनी आजरा पोलिसात चोरीची तक्रार दिली होती.
---------------------
चौकट
...तर सत्य उघडकीस येण्याची शक्यता
दरम्यान, चौकशी समितीचा अहवाल सादर झाला आहे. समितीने त्या काळात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हलगर्जी, निष्काळजी व बेजबाबदारपणा दाखवल्या बद्दल बोट ठेवले आहे. त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पण या प्रकरणाचा मुळात जावून तपास केल्यास सत्य उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57284 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..