
कांदा भाव कमी
आवक वाढल्याने
कांद्याचे भाव गडगडले
कोल्हापूर, ता. ११ ः येथील शाहू मार्केट यार्डातील कांदा-बटाटा बाजारात सध्या कांद्याची आवक वाढल्याने दुसऱ्यांदा भाव घसरले आहेत. ४० ते १४० रुपये असे दहा किलोपर्यंत कांदा भाव खाली आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना कांदा स्वस्त मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
उन्हाचा तडाखा, वादळ, वारे, पावसाची शक्यता व नैसर्गिक आपत्ती ओढवलीच तर कांद्याचे नुकसान होईल या संभाव्य धोक्याचा विचार करून बहुतांशी शेतकरी कांदा तातडीने बाजारपेठेत आणत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डात आवक वाढली आहे. दिवसाला सरासरी १२०० पोत्यांची आवक होत आहे. दोन महिन्यांत ४ लाख २८ हजार पोत्यांची आवक झाली. यातील जवळपास दहा हजारांवर पोत्यांचा माल अद्याप शिल्लक आहे. अशात रोज नव्याने कांदा येत आहे.
कोल्हापूरच्या घाऊक बाजारपेठेत येणारा कांदा गोवा, कोकण, कर्नाटक, केरळकडे पाठवला जातो. त्यानुसार मागील महिन्यातच मोठ्या प्रमाणात तो तिकडे पाठवला गेला. तो माल संपलेला नसल्याने पुन्हा नव्या मालासाठी मागणी नाही. परिणामी कोल्हापूर बाजारात येणाऱ्या कांद्याचे करायचे काय हा प्रश्न आहे. भाव कमी झाले, तरीही अन्य जिल्ह्यांतील बाजारपेठांच्या तुलनेत कोल्हापुरात दोन ते दहा रुपये भाव जास्त मिळतो म्हणून शेतकरीही कांदा घेऊन कोल्हापूरला येत आहेत; मात्र चार दिवसांत कांद्याचे भाव पडल्याने नफा मिळवणे दूरच; पण घातलेल्या खर्चाचा मेळ बसवणेही शेतकऱ्याला अशक्य होत आहे.
चौकट
किरकोळ बाजारात तेजी
घाऊक बाजारात पहिल्या श्रेणीचा कांदा १४० रुपये दहा किलो आहे. त्यामुळे सगळ्यात चांगल्या दर्जाचा कांदा २० रुपये प्रती किलो किरकोळ बाजारपेठेत मिळणे आवश्यक आहे; मात्र किरकोळ विक्रेते बहुतांशी माल हा ६८० रुपये दहा किलोने घेतात. तो कांदा २० ते २५ रुपये एक किलो भावात विकून कमाई करून घेत असल्याचे चित्र आहे. यात ग्राहकाला भुर्दंड बसत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57297 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..