
अतिक्रमण कारवाई
आता इतरत्रही लक्ष द्या
राजारामपुरी अतिक्रमण कारवाई; शहरातील बहुंताशी ठिकाणी पार्किंगची समस्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः राजारामपुरीतील बंदिस्त पार्किंगवर झालेल्या कारवाईचे स्वागत होत असतानाचा आता महापालिका अशीच कारवाई शहराच्या इतर भागांतही सुरू करणार का, हा प्रश्न आहे. एखाद्या कारवाईचा गाजावाजा करायचा आणि पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करायचे, हा पायंडा यावेळी तरी निदान पडू नये, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवार (ता. १०) राजारामपुरीतील पार्किंग समस्येबाबत बैठक झाली. त्यात बंदिस्त पार्किंगवर कारवाई करण्याचे आदेश पाटील यांनी दिले. काल बैठक, त्यात आदेश आणि आज लगेच महापालिकेने कारवाईचा धडाकाही सुरू केला. आता यात सातत्याची तर गरज आहेच, पण शहराच्या अन्य भागांतील केवळ बंदिस्त पार्किंगवर नव्हे तर रस्त्यावर पार्किंगच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, न्यू शाहूपुरी, गुजरी, मंगळवार पेठ, भाऊसिंगजी रोड, मध्यवर्ती बस स्थानक, ताराबाई रोड अशा सर्वच परिसरात पार्किंगच्या जागेत दुकानगाळे सर्रास दिसत आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील पार्किंगची समस्याही अनेक वर्षांपासून आहे. उपनगरातील फूटपाथ तर लोकांना चालण्यासाठी आहेत का फळ विक्रेत्यांसाठी आहेत, असे वाटावे अशी परिस्थिती आहे; पण त्यावर कधी कारवाई होत नाही. शिवाजी विद्यापीठासमोर सायकल ट्रॅक केला; पण त्यावर चारचाकी वाहनांचे पार्किंग ठरलेले आहे. शहरातील फक्त मोठ्या रुग्णालयांच्या पार्किंगचा शोध घेतला आणि कारवाई झाली तर रुग्णालयाबाहेरील वाहनांची गर्दी कमी होईल.
राजारामपुरीत एकाच रस्त्यावर कारवाई न करता तिन्हीही मुख्य रस्त्यावर बंदिस्त पार्किंगच्या ठिकाणी काय आहे, याची पाहणी एकदा महापालिका यंत्रणेने करण्याची गरज आहे. बस स्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्सच्या पार्किंगमध्ये तर खुलेआम व्यवसाय सुरू आहेत. गुजरी, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, ताराबाई रोडवर तर दुचाकी लावायची कुठे, हेच समजत नाही, अशी स्थिती आहे. अशा ठिकाणीही महापालिका यंत्रणेकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या इमारतीच्या परिसराभोवती जरी प्रशासक किंवा अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एखादा फेरफटका मारला तर तिथल्या वाहतूक कोंडीचा अंदाज येऊ शकतो. या परिसरात ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती आहे.
चौकट
बावड्यात वाहतूक कोंडी नित्याची
कसबा बावडा मुख्य रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा असल्यासारखी स्थिती आहे. या रस्त्यावर फूटपाथ आहे; पण त्यावरच सर्रास दुचाकी, चारचाकी वाहने लावली जातात. काही दुकानांच्या पायऱ्या थेट या फूटपाथला येऊन चिकटल्या आहेत, काही दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्त्याचा परिसर व्यापला आहे. या भागांतही महापालिकेच्या यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.
चौकट
अधिकाऱ्यांना ‘फुल्ल’ अधिकार
सध्या महापालिकेतील नगरसेवकराज संपुष्टात आले आहेत. त्यामुळे एखाद्या कारवाईत नगरसेवकांचा होणारा हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही. त्यामुळे महापालिका प्रशासक आणि अधिकाऱ्यांना ‘फुल्ल’ अधिकार आहेत, त्याचा वापर करून शहर अतिक्रमणमुक्त करण्याची ही संधी अधिकाऱ्यांनी घ्यावी.
चौकट
या ठिकाणी दिले पाहिजे लक्ष
शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, गुजरी परिसर, भाऊसिंगजी रोड, गंगावेस, महाद्वार रोड, बिंदू चौक परिसर, स्टेशन रोड, मध्यवर्ती स्टॅंड परिसर, बागल चौक परिसर, कावळा नाका ते धैर्यप्रसाद हॉल, रंकाळा रोड परिसर.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57336 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..