
जयश्री जाधव शपथ विधी
२१२१०
आमदार जाधव यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ
मुंबईत सोहळा; महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. मुंबईतील विधान भवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून दुपारी साडेबाराच्या सुमारास शपथ घेतली. यावेळी स्थानिक नेते, कुटुंबीय आणि काही माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेस नेत्यांकडूनही सत्कार झाला.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. काँग्रेसतर्फे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी निवडणूक लढविली. येथे प्रचारासाठी दिग्गज नेते सहभागी झाले होते. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी मुंबईत नेत्यांच्या भेटी घेतल्या. आज प्रत्यक्षात त्यांनी शपथ घेतली.
शपथविधीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम टोपे, प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57355 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..