
मोटारीची काच फोडून दागिने लंपास
कोल्हापूरच्या व्यावसायिकाचे
३७ तोळ्यांचे दागिने चोरीस
सांगलीत मोटारीची काच फोडून पर्स पळविली
सांगली, ता. ११ : कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकाचे ३७ तोळ्यांचे दागिने मोटारीची काच फोडून चोरून नेण्यात आले. हा प्रकार काल रात्री सांगलीतील विजयनगरमध्ये घडला. या दागिन्यांची किंमत १४ लाख ८१ हजार ५०० रुपये अशी किंमत होते. याबाबत सिद्धेश विजय माने (वय २७, बी वॉर्ड, ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सिद्धेश माने यांच्या पत्नीचा मावसभाऊ संदीप जाधव यांचा मंगळवारी बेडग (ता. मिरज) येथे विवाह होता. दुपारी लग्नसमारंभ आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता माने मिरज एमआयडीसी रस्त्यावरील महाराष्ट्र लॉनसमोर सासूरवाडीत आले. तेथून रात्री पावणेदहा वाजता माने, पत्नी माया, सासरे वसंत खोत, सासू शोभा, मेहुणा जीवन, मेहुणी दया असे सर्वजण विजयनगर येथील सेलिब्रेशन हॉटेलमध्ये जेवणासाठी आले. माने यांच्या पत्नीचे दागिने एका पर्समध्ये ठेवले होते. हॉटेलमध्ये जाताना पर्स मोटारीत (एमएच ०९ ईयू ८३२५) चालकाच्या सीटवर ठेवून दरवाजा लॉक केला. माने यांनी मोटार हॉटेलच्या डाव्या बाजूला मोकळ्या जागेत लावली होती. सर्वजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर चोरट्याने दरवाजाची काच फोडून आतील पर्स पळवली. जेवणानंतर रात्री सव्वाअकराच्या सुमारास माने मोटारीजवळ आले, तेव्हा उजव्या बाजूची काच फोडल्याचे दिसले. सीटवरील पर्स पळवल्याचे लक्षात आले. तब्बल ३७ तोळ्यांचे दागिने चोरट्याने अगदी सहजपणे लांबवल्याचे समजताच परिसरातील सर्वांनाच आश्चर्य वाटले.
चौकट
चोरीला गेलेला ऐवज...
दहा तोळ्यांचे गंठण, पाच तोळ्यांचा नेकलेस, दहा तोळ्यांचे दोन तोडे, दहा तोळ्यांच्या चार बांगड्या, दोन तोळ्यांची कर्णफुले, चांदीच्या खड्याचे मंगळसूत्र.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57375 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..