
पोलिस वृत्त
२१५३
शेंडूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या
सिद्धनेर्ली ः शेंडूर (ता. कागल) येथील शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुष्पक बिरु बंडगर (वय १५) असे त्याचे नाव आहे. मृत पुष्पकने दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. आज सकाळी तो दहावीच्या तासासाठी जाऊन आला होता. दुपारी आई-वडील शेताकडे गेले असता. घराचे दरवाजे बंद करून घेऊन गळफास घेतला. आई-वडील शेतातून आल्यानंतर बंद असलेल्या दरवाजाच्या खिडकीतून पाहिले असता हा प्रकार पाहिला. एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांसह बहिणीने हंबरडा फोडला. त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पुष्कर दोनच दिवसांपूर्वी मामाच्या गावाकडे पंधरा दिवस सुटीसाठी राहून परतला आहे. याची पोलिसात नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
यड्रावात बंद कारखान्यात चोरी
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमागील बंद यंत्रमाग सहकारी कारखान्यातून चोरट्यांनी सुमारे १ लाख ५५ हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. जयवर्धन यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेचा मागील दरवाजा तोडून ५८ मोटारी आणि यंत्रमागाचे खराब स्क्रॅप चोरीला गेले. याबाबतची फिर्याद कीर्तीमालीनी वसंतराव नाईक (इचलकरंजी) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. जयवर्धन यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था दीड महिन्यापासून बंद आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाजा तोडून ४८ मागावरील ४८ मोटारी, तसेच कांडी मशिनवरील चार, कॉम्प्रेसरवरील एक, चार स्पेअर व एक इमरीवरील अशा ५८ मोटारी चोरल्या. फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हातकणंगलेत रिक्षासह दारूचा साठा जप्त
हातकणंगले ः सांगली-कोल्हापूर रोडवरील चोकाक येथील इंडियन पेट्रोल पंपासमोर रिक्षा व मद्याचा साठा असा एक लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. हातकणंगले पोलिसांनी ही कारवाई केली. राजकुमार अशोक घाटकर (वय ४४, रा. हातकणंगले व कपील शंकर रूकडीकर (वय २७, रा. रूकडी) हे मद्यची वाहतूक करत होते. तपास सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग पाटील करत आहेत. घाटकर याच्यावर याआधी पाच वेळा स्थानिक गुन्हे अन्वेषन व स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा आरोपींवर जुजबी कारवाई न करता हद्दपारीसह कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सांगितले.
विक्रेत्यांचा अंत्ययात्रा काढण्याचा इशारा
जयसिंगपूर : शहरातील अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीसाठी भाजीपाला विक्रेते उपोषणाला बसले आहेत; मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. गुरुवारी (ता. १३) दुपारी बारापर्यंत निर्णय झाला नाही तर आंदोलनकर्त्यांची जिवंत अंत्ययात्रा काढण्याचा इशारा आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, १० मे पासून जवळपास पन्नास ते साठ जण क्रांती चौकात उपोषणाला बसले आहोत. गुरुवारी दुपारी बारापर्यंत उत्तर न आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, जयसिंगपूर पोलिसांना दिल्या आहेत.
भरधाव वाहन चालविणाऱ्यांना शिक्षा
जयसिंगपूर : भरधाव, निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल पाच वाहन चालकांना न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत शिक्षा आणि पाचशे रुपयांचा दंड आणि दंड न दिल्यास एक महिना कैद अशी शिक्षा सुनावली. अनिल वसंत नालुके, बाबासो सीताराम शिंदे, विठ्ठल आबा पाटील, (सर्व शिरोळ), अक्षय तानाजी घाटगे, इलाई जाफर मुल्ला (दोघे जयसिंगपूर) यांना दोषी धरून कोर्ट कामकाज संपेपर्यत कैद, पाचशे दंड तर दंड न भरलेस एक महिना कैद अशी शिक्षा न्यायलयाने सुनावली. सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.
अपघातात दोघे जखमी
कोल्हापूर ः सावित्रीबाई फुले हॉस्पिटलनजीक काल रात्री झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. सुलेमान दिलावर बागवान (वय ४०, भोई गल्ली) व अमेय महेंद्र मांगलेकर (२०, कोंडेकर गल्ली, शिवाजी पेठ) अशी त्यांची नावे आहेत. रात्री आठच्या सुमारास दोघांनाही सीपीआरमध्ये दाखल केल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
मानवी कवटीची चाचणी करणार
आजरा ः येथील रामतीर्थपर्यंत स्थळाजवळ दोन दिवसांपूर्वी मानवी कवटी सापडली होती. कवटी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी कवटी ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. कवटीची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शेतीच्या वादातून बापलेकास मारहाण
कोल्हापूर ः आरळा (ता. शिराळा) येथे शेतीच्या वादातून बापलेकास मारहाण करण्यात आली. निवृत्ती पांडुरंग चौगले (वय ६२) व नागेश निवृत्ती चौगले (२७) अशी जखमींची नावे आहेत. दोघांनाही जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले असून याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57376 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..