नाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाले
नाले

नाले

sakal_logo
By

नाल्याचा नकाशा 21465
------
नाले सफाईचा बट्ट्याबोळ
गाळ उपसाही ठराविक भागात; पाईप, बांधकामामुळे अनेक ठिकाणी पात्र झाले कमी


कोल्हापूर ः शहरात गल्लीतील छोट्या गटारांची स्वच्छता नियमित होत असली तरी त्याच भागातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढिग कायम आहेत. अनेक नाल्यांवरील स्लॅब, ठिकठिकाणी असलेल्या केबल्सच्या पाईपमध्ये अडकलेला कचरा सांडपाणी अडवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. महापालिकेकडून राबविल्या जात असलेल्या मोहिमेत काही ठिकाणी गाळ उपसा, तर काही ठिकाणी जैसे थे अशी परिस्थिती आहे. रस्त्यालगत व लोकांच्या दृष्टीस पडणाऱ्या नाल्यांच्या ठिकाणी मोहीम राबवली आहे. अनेक ठिकाणी घरांच्या बांधकामामुळे नाले आक्रसले गेले असून, या साऱ्यांमुळे सांडपाणी अडून एखादा वळीव कोसळल्यास गटारातून सांडपाणी बाहेर पडते व रस्त्यावर पसरते. पावसाळा आला की, जागे होण्यापेक्षा प्रत्येक महिन्याला भागनिहाय सफाई तसेच नाल्यांचा आकार कमी होऊ न देणे हाच पर्याय महापालिकेच्या हातात आहे. शहरातील नाल्यांचा ‘सकाळ’चे बातमीदार उदयसिंह पाटील, शिवाजी यादव, ओंकार धर्माधिकारी यांनी केलेला live रिपोर्ट.


21221, 21222

शिवाजी पेठेत नाला बंदिस्त
शिवाजी पेठेतील गांधी मैदान परिसरातून शिवाजी तरुण मंडळाच्या इमारतीपाठीमागील नाल्यातून सांडपाण्याचा प्रवाह आहे. त्या इमारतीजवळील नाल्याची अवस्था पाहिली की, सभोवताली टाकला जाणारा कचरा घेऊन वाहणारा नाला असेच म्हणावे लागेल. तिथून कचरा घेऊन जाणारा नाला रस्ता क्रॉस करून महाकालीसमोरील वस्तीतून स्लॅबखाली बंदिस्त झाला आहे. त्याच्या तोंडावर कायम स्वच्छता केली जात असली तरी स्लॅबखालील नाल्यातील प्रवाह कुठे अडला हे केवळ अंदाजाने ओळखूनच साफ करावे लागते. त्यामुळे तिथून साकोली कॉर्नरजवळील क्रॉसड्रेनजवळ उघड्या होणाऱ्या नाल्यात कचऱ्याचा ढिग होता. तिथून नागोजीराव पाटणकर हायस्कूलकडे जाणाऱ्या नाल्यात कोपऱ्यावरच केबल्सचे जंजाळ असल्याने त्याला अडून थोडे संथ होऊन सांडपाणी पुढे जात होते. हायस्कूलच्या मैदानातून रंकाळा रोडच्या दिशेने गेलेल्या नाल्यातील स्वच्छता पुढे रस्त्यालगतच होते. जवळपास शंभर फुटांहून अधिक लांबीचा हा नाला भूमिगत आहे. त्या परिसरात काही झाले तर सफाईसाठी मॅनहोल्स ठेवले आहेत; पण लांबी पाहिल्यास त्याचा फारसा उपयोग नाही.
...

21224, 21223

दुधाळीतील नाल्यात कचरा
रंकाळा रोडकडून दुधाळी परिसरात येणाऱ्या नाल्यात भागातील छोटे नाले मिसळतात. ते सर्व बंदिस्त केले असून, सफाईसाठी काही जागा सोडल्या आहेत. दोन बंगल्यांमधून वाहणाऱ्या नाल्याची सफाई करायची झाल्यास त्यात उतरण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अनेकदा साठलेला कचरा काढण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. भागात गटारांची स्वच्छता केली जात असली तरी काढलेला कचरा उचलून टाकण्यासाठीची यंत्रणा नव्हती. त्यामुळे कचरा रस्त्यावरच होता. दुधाळी शूटिंग रेंजकडे जाणाऱ्या पुलाजवळ नाल्याचा परिसर कचरा टाकण्यासाठीच झाला आहे, असे दिसते. तिथे टाकला जाणारा कचरा अडवणारी भिंत नसल्याने तो थेट नाल्यात पडतो. तिथे असलेल्या केबलच्या पाईपमुळे तो अडकून राहिला होता. तिथून पुढे मैदानाशेजारून जाणाऱ्या नाल्यात आणखी एका ठिकाणी अनधिकृत कोंडाळा झाला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नाल्यात सांडपाण्याबरोबरच कचराही वाहत होता.
...
जामदार क्लबसमोरील गटार तुडूंब
पंचगंगा हॉस्पिटलकडून पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जामदार क्लबसमोर गटार कचऱ्याने तुडूंब भरले होते. तिथून सांडपाणी पुढे घालवण्यासाठी सफाई कर्मचारी अडकलेला कचरा दूर करण्याचा प्रयत्न करत होता. या रस्त्यावर गटारातून कचरा काढून रस्त्यावर टाकला होता. तो उचलला गेला नव्हता. परिणामी तो पुन्हा गटारातच जात होता. नदीवर परीट घाटाजवळ सांडपाणी घेऊन जाणाऱ्या नाल्यात प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या पडलेल्या होत्या.
...
21226
सीपीआर नाल्यातून दररोज उपसा
सीपीआरमधून बाहेर पडणारे सांडपाणी चिमासाहेब महाराज चौकात रस्ता ओलांडून करवीर पंचायत समितीच्या दिशेने वळवले आहे. तिथून पाईपलाईनने जयंती नाल्याजवळील सांडपाणी उपसा केंद्राकडे नेले आहे. तत्पूर्वी चौकानजीक कचरा पुढे जाऊ नये म्हणून जाळी लावली आहे. ती दररोज सकाळी कचऱ्याने भरलेली असते. ती दररोज स्वच्छ केली नाही तर तिथून सांडपाणी ओसंडून पुढे जयंती नाल्यात मिसळते. त्यामुळे काढलेल्या कचऱ्याचा ढिग त्या जाळीजवळ पसरलेला आहे. तो थेट जयंती नाल्यात जातो. जयंती नाल्याजवळ सांडपाणी अडवले असले तरी सिद्धार्थनगर पाठीमागील बाजूस नाला तुडूंब भरला आहे. त्यात प्लास्टिकचा कचरा भरलेला आहे.
...
21228
स्लॅबखाली कचऱ्याचा ढिग
पार्वती टॉकिजजवळील एमजी मार्केटसमोरून शाहूपुरीत जाणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकला आहे. तो स्लॅब अर्धवट फोडला आहे; पण त्याखाली असलेला कचरा कधी काढलेला नाही असे दिसते. तिथे जवळपास अर्धा नाला कचऱ्याने भरला आहे. त्यात प्लास्टिकचे प्रमाण प्रचंड आहे. रस्त्याच्या अलीकडून आलेल्या गटारात कचरा भरलेला आहे. त्याची स्वच्छता झालेली नाही.
...
21229
राजारामपुरीचा नाला फुल्ल
जनता बझार चौकातून शाहू मिल चौकीजवळून शाहूपुरीत जाणारा नाला रस्त्यालगत असलेल्या केबल्समुळे अडकलेल्या कचऱ्याने फुल्ल झाला होता. सांडपाणी दिसत नव्हते इतके कचऱ्याचे प्रमाण होते. हा नाला एखाद्या वळीव पावसानेही ओसंडून वाहून चौकात पाणी तुंबते.

...
21390, 21393, 21392

नाला केला निमुळता
प्री.आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटरपासून सुरू होणाऱ्या नाल्याला आता गटाराचे स्वरूप आले आहे. हा नाला काही ठिकाणी भूमिगत आहे, तर काही ठिकाणी काटकोनात वळवला आहे. येथे साठलेल्या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी अडून बाहेर येऊन जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका आहे. पूर्वी नदीकाठावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना त्रास होत होता; मात्र आता शहराच्या अन्य भागातही ओढे, नाले यांतील पाणी पात्राबाहेर आल्याने पूर येत आहे. हे पाणी नागरिकांच्या घरात येते. काही भागात रस्त्यावर साचून वाहतूक ठप्प होते. प्री.आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटर ते जयंती नाला असा प्रवास करणाऱ्या या नाल्याची स्थिती याहून वेगळी नाही. राजाराम महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतनच्या पिछाडीस असणाऱ्या विस्तीर्ण माळावर पडणारे पावसाचे पाणी या नाल्यातून वाहते; मात्र जिथे हा नाला सुरू होतो तेथेच कचऱ्याचे ढिग साचल्याने पाणी तुंबण्याची शक्यता आहे. चॅनेलच्या माध्यमातून नाला निमुळता केला आहे. पुढे हा नाला भूमिगत केला आहे. काही ठिकाणी घातलेले पाईप छोटे असल्याने पाणी पात्राबाहेर येते. त्यामुळे राजाराम रायफल चौकात पावसाळ्यात पाणी साचून रस्ता काही काळासाठी बंदही होतो. पुढे हा नाला राजारामपुरी एक्स्टेंशन भागात येतो. इथे हॉटेल ऑल दी बेस्टजवळ नाल्याचे पात्र आणखी निमुळते होते. त्यातच नाल्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला आहे. यामध्ये प्लास्टिक बाटल्यांचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यापूर्वी हा कचरा काढला जावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. दरवर्षी या परिसरात नाल्याचे पाणी साचते. इथल्या घरांच्या तळघरातही पाणी शिरते. हा नाला पुढे ताराराणी विद्यापीठाच्या जागेतून पुढे जनता बझार, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिछाडीतून कबरस्तान मार्गे शाहूपुरीत जातो. तेथून तो जयंती नाल्याच्या मुख्य प्रवाहाला मिळतो. या मार्गात काही ठिकाणी हा नाला काटकोनात वळवला आहे. त्यामुळेही पावसाळ्यात पाणी नैसर्गिक वाट शोधते. त्यामुळेही काही भागांत वाहतूक विस्कळीत होते.
...
काही भाग वगळून गाळ उपसा
कळंबा तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी पाचगावच्या ओढ्यात येते. त्याला आणखी एक ओढा मिळतो आणि जरगनगरमधून दोन्ही ओढ्यांचे एकच पात्र तयार होते. हा ओढा पुढे रामानंदनगर, आयसोलेशन हॉस्पिटलच्या मागील बाजूने, यल्लमा मंदिर मार्गे सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या मागून शाहूपुरीत जयंती नाल्याला मिळतो. रामानंदनगरमध्ये ओढ्याला संरक्षक भिंत घातल्याने पात्र निमुळते झाले आहे. पुढे कृषी संशोधन केंद्राच्या जागेत एक शाहूकालीन बंधारा आहे. हाही पाण्याच्या वहनातील अडथळा आहे. जास्त पाऊस पडला की, या ओढ्याचे पाणी रामानंदनगरमधील घरांमध्ये शिरते. तसेच पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होते. यल्लमा मंदिर परिसरातील काही घरांमध्येही पाणी शिरते. तेथील गाळ, कचरा काढलेला नाही. या परिसरात पात्राचे खोलीकरण केलेले नाही. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात घनकचराही वाहून येतो. रामानंदनगरपासून पाठीमागे गाळ काढला आहे; पण काही ठिकाणी ओढ्याकाठीच ठेवला आहे. या साऱ्यांमुळे पावसाळ्यात धोका होऊ शकतो.
...
21380, 21381, 21383

मोठे ओढे झाले लहान
कावळा नाका ते तावडे हॉटेलपर्यंत जवळपास बारा नाले आहेत. यांतील पाच मोठे ओढे असून, त्यांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीला जाते. अन्य आठ लहान नाले मोठ्या नाल्यांना मिळतात. पावसाळ्यात त्यांचे पाणी परिसरात गल्लीत साचते. महापुराच्या पाण्याची फुग जास्त दिवस साठून राहते. पावसाळ्यात पाटोळेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, घोडकेवाडी, बापट कॅम्प परिसरातील बहुतांशी भाग पुरात सापडतो. या भागातील शेती विकून प्लॉट पाडण्यात आले. तिथे उंच अपार्टमेंट बनल्या. काही इमारती बांधताना जवळून जाणाऱ्या ओढ्यांना सिमेंट कॉंक्रिटचे कुंपण घातले. ओढ्यांचा आकार लहान केला गेला. परिणामी मोठ्या ओढ्यांना लहान नाल्याचे रूप आले. मोठा पाऊस झाल्यानंतर पाण्याची पातळी वाढून ते नाल्यातून बाहेर पसरते. मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी व पाटोळेवाडीच्या मागील भागातील नाल्यांची ही अवस्था दरवर्षी पाहायला मिळते. महापुराच्या विळख्यात गल्ली सापडत असल्याची स्थिती मुक्त सैनिक वसाहत ते बापट कॅम्प परिसरात आहे. पाच वर्षांत दोन महापूर आले, तरीही महापालिकेने उपाययोजना राबवल्या नाहीत. यंदाही पुराच्या संकटांची टांगती तलवार आहे.
---
येथे झाला आकार छोटा
विद्या कॉलनीतून मुक्त सैनिक रिक्षा स्टॉपजवळून जाणारा ओढा सात फुटांचा होता, तो चार फुटी केला आहे. मार्केट यार्डकडून घोडकेवाडीतून जाधववाडीत जाणारा पाच फुटी ओढा एका हॉटेलजवळ अडीच फुटी केला आहे. जाधववाडी, कदमवाडी रस्त्यावर दहा फुटी ओढ्याला तीन फुटी सिमेंटचे दोन नळे घालून आकार लहान केला आहे. बापट कॅम्पमध्ये गटार खुले ठेवले आहे. ज्याच्या हद्दीत ओढ्याचे पाणी वळवले किंवा आकार लहान केला आहे, तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57396 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top