आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त बैठक
आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त बैठक

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त बैठक

sakal_logo
By

21296
गडहिंग्लज : प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या वेळी संपत देसाई, शिवाजी गुरव, सचिन पावले, सखाराम कदम, महादेव खाडे आदी.
(आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)


मुश्रीफ यांच्यामुळेच पुनर्वसन रखडले
आंबेओहोळ धरणग्रस्तांचा आरोप; भूखंड वाटपात ''मंत्री सांगे, प्रशासन डुले'' कारभारावर संताप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या प्रश्‍नावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केलेल्या भावना दिखाव्यासाठी आहेत. खरे तर त्यांच्यामुळेच आंबेओहोळ पुनर्वसनाचा प्रश्‍न रखडला, प्राधान्यक्रम डावलून केवळ राष्ट्रवादीच्याच लोकांना गावठाणातील भूखंड वाटले, मंत्री सांगे आणि प्रशासन डुले, असा कारभार सुरू असल्याचा संताप प्रकल्पग्रस्तांनी आजच्या बैठकीत व्यक्त केला. येथील तहसील कार्यालयात प्रकल्पग्रस्त पुनर्वसन आढावा आणि विविध मागण्यांसाठी आज प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वाघमोडे यांनी प्रशासनाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. गावठाणातील भूखंड वाटप मुद्यावर चर्चा होताना कडगाव व लिंगनूर गावठाणात २२ लोकांना भूखंड वाटपाचे आदेश झाल्याचे श्री. वाघमोडे यांनी सांगितले. यादीतील नावे वाचली. त्यानंतर खडाजंगीला सुरुवात झाली. धरणग्रस्तांचे नेते संपत देसाई, शिवाजी गुरव, सचिन पावले, सखाराम कदम, महादेव खाडे आक्रमक होवून प्रशासनाला धारेवर धरले.
भूखंड वाटप यादीतील नावे केवळ राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांची आहेत. गरीब प्रकल्पग्रस्तांना डावलले आहे. अनेकांचे अर्ज त्यांच्या पूर्वी देऊनही भूखंड मिळाले नसल्याचे गुरव यांनी सांगितले. मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन अधिकारी कारभार करत असतील तर बैठकच कशाला पाहिजे असे म्हणत गुरव बैठकीतून बाहेर जाऊ लागले. मात्र देसाईच्या विनंतीनुसार त्यांनी पुन्हा बैठकीत भाग घेतला. वाघमोडे यांनी जमीन असलेल्या ठिकाणी गावठाणातील भूखंड वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पावले यांनी मुम्मेवाडीत जमीन वाटप झालेल्या प्रकल्पग्रस्ताला लिंगनूर गावठाणात कसे भूखंड मिळाले, याचा जाब विचारला. वाघमोडे यांनी हा आदेश अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा असल्याने त्यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही दिली. शिल्लक राहिलेले प्रकल्पग्रस्त सर्वच भूखंडासाठी पात्र असल्याचेही ते म्हणाले.
पुनर्वसन कायद्याला बगल देऊन कारभार करायला काय ही प्रॉपर्टी मंत्र्यांची आहे का, असा प्रश्‍न सचिन पावले यांनी विचारला. गोंधळातच चर्चा सुरु असताना संपत देसाई यांनी भूखंड वाटपासाठी आठ किलोमीटरची अट कायद्यातच असून लिंगनूर व कडगाव केवळ एक किलोमीटर असताना काही तरी निकष लावून प्रकल्पग्रस्तांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे सांगितले. २२ जणांचे आदेश तत्काळ रद्द करून नव्याने ड्रॉ पद्धतीने भूखंड वाटपाची कार्यवाही व्हावी, अशी मागणी देसाई यांनी केली. आंबेओहोळचे पुनर्वसन रखडण्यास मुश्रीफच जबाबदार असल्याचा आरोप गुरव, देसाई, पावले आदींनी केला. पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या शंकाचे निरसन केले. तहसीलदार दिनेश पारगे, उपअभियंता दिनेश खट्टे, नायब तहसीलदार अशोक पाटील, जीवन क्षीरसागर, अव्वल कारकून प्रवीण कदम उपस्थित होते.

* सुपिक जमिनी लपविल्या
आंबेओहोळ लाभक्षेत्रातील जमिनीवर प्रकल्पग्रस्तांचा हक्क आहे. परंतु गडहिंग्लज, बेकनाळ परिसरातील सुपिक जमिनी लपवून प्रशासन दगडधोंड्याची आणि खडकाळ जमीन प्रकल्पग्रस्तांच्या माथी मारत आहे. केवळ राजकीय दबावाखाली येऊनच असा कारभार सुरू आहे. तालुका ते जिल्हा पातळीपर्यंतचे सर्व प्रशासन मंत्री सांगतील त्या पद्धतीने वागत असल्याचा थेट आरोप केला.

* ठळक मुद्दे
- सुपिक असलेली परंतु, कोर्ट स्टे असलेली २१ हेक्टर जमीन दाखवण्याचा आग्रह मान्य
- चित्री लाभक्षेत्रातील जमीन मान्य नसल्याचे प्रकल्पग्रस्तांचे स्पष्टीकरण
- भरपाई महिनाअखेरपर्यंत देण्याची ग्वाही
- जमीन, पॅकेज न मिळालेल्यांना स्वनिधीतून निर्वाह भत्ता देण्याची कार्यवाही
- कब्जा हक्क रक्कमेचा बोजा सातबारावरून हटवावा
- जमीन पाहणी कार्यक्रमावेळी संपादन नकाशा आणण्याची मागणी मान्य

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57488 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top