
इचलकरंजी स्मशानभूमीतील पार्किंगचा प्रश्न प्रलंबित
21332
---
स्मशानभूमीतील पार्किंगचा प्रश्न प्रलंबित
इचलकरंजीत सात लाख ७१ हजारांच्या कामांना मंजुरी मिळूनही अपूर्ण
इचलकरंजी, ता. १२ : शहरातील पंचगंगा स्मशानभूमी पार्किंग प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेमध्ये रस्ता, रिलिंग, माहिती फलक लावण्यासाठी ७ लाख ७१ हजार रुपयांच्या कामास मंजुरी देऊन महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र, केवळ रस्त्या व्यतिरिक्त सर्व कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील पार्किंग समस्या कधी मार्गी लागणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
इचलकरंजी-कर्नाटक यास जोडणाऱ्या राज्यमहामार्गावर असलेल्या स्मशानभूमीवर पार्किंग सुविधा नसल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असते. परिणामी, दहनविधीसाठी आलेल्या नागरिकांना वरचेवर मनस्ताप सहन करावा लागतो. तर मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनाही मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्मशानभूमीमधील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा मार्ग ही अवलंबावा लागला. मात्र, सध्याही केवळ जुन्या पुलापासून रस्ता करण्यात आला आहे. तर अद्याप पार्किंगच्या जागेचे बहुतांशी काम अपूर्ण आहे. इचलकरंजी शहरातील सुमारे चार लाख नागरिकांसाठी दहनासाठी शहापूर व पंचगंगा अशा स्मशानभूमीची व्यवस्था पालिका प्रशासनाने केली आहे. मात्र, अधिकतर अंत्यविधी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये होतात. येथे दररोज सुमारे ४ ते ५ मृतदेह दहन होतात. तर तितकेच रक्षाविसर्जन करण्यासाठी येत असतात. राज्यमहामार्गावर असलेल्या या स्मशानभूमीत पार्किंग सुविधा नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.
पालिका प्रशासनाकडून १५ लाख रुपये खर्च करून सुमारे ३०० दुचाकी वाहन पार्किंग होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे रिलिंग, माहिती फलक व रस्ता करण्यासाठी ३० मार्च रोजी टेंडर मंजूर करण्यात आले. मात्र, कामाची गती पाहता मक्तेदार येणाऱ्या पुराची प्रतीक्षा करीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पंचगंगा स्मशानभूमीमधील पार्किंगचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
-----------
पार्किंग फलकाची गरज
पंचगंगा स्मशानभूमीमध्ये वाहने पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेची माहिती अधिकतर नागरिकांना नाही. त्यामुळे स्मशानभूमीत आलेले नागरिक वाहने रस्त्यावरच पार्किंग करितात. परिणामी, मृतदेह दहन करण्यासाठी घेऊन जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी पार्किंग फलक लावून लोकार्पण करण्याचे गरज निर्माण झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57514 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..