
शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करावेत ः एस. बी. माने-पाटील
21345
कोवाड : शिवार फेरीत शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करताना एस. बी. माने-पाटील व इतर.
शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करावेत
एस. बी. माने-पाटील; हेमरसतर्फे पीक परिसंवाद, शिवार फेरी
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. १३ : उसाच्या वाढीबरोबर ऊस पिकाची निगा राखणे व रोगराईपासून त्याचा बचाव हे शेतकऱ्यासमोरचे आव्हान आहे. हवामानात सतत होणारा बदल व त्यातून निर्माण होणाऱ्या किडी व रोगांच्या साथी आटोक्यात आणून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यानी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन माजी ऊस पीक शास्त्रज्ञ एस. बी. माने-पाटील यांनी केले.
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम हेमरस साखर कारखान्यातर्फे ऊस विकास कार्यक्रमांतर्गत गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यात १ ते ५ मेपर्यंत ऊस पीक परिसंवाद व शिवार फेरीचे आयोजन केले होते. या वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माने-पाटील मार्गदर्शन केले. या वेळी ते बोलत होते. हेमरसचे बिझनेस हेड भरत कुंडल व शेती अधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते.
गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी, हनिमनाळ, बटकणंगले, शिट्टीहाळी या गावांतून शेतकरी मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिवार फेरीत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन माने-पाटील यांनी ऊस पिकाची वाढ, पाणी, बियाणे, कीड व खतांच्या मात्रेबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन चर्चा केली. हुमणी आटोक्यात आणण्यासाठी प्रकाश सापळ्यांचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याबाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. रोगराई व किडींचा वेळीच बंदोबस्त केला. तर त्याचे प्रमाण आटोक्यात येते. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती विभागाचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना कराव्यात, असे माने-पाटील यांनी सांगितले. चंदगड तालुक्यातील अडकूर, पाटणे फाटा, शिनोळी, मुरकुटेवाडी, बसर्गे, सुरूते, किटवाड, मलतवाडी व राजगोळीतही त्यांनी मार्गदर्शन केले. हुमणी, लोकरी मावा, तांबेरा व पोवळा बोंग या किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले.
--------------------
कोट
हेमरस साखर कारखान्यातर्फे वर्षभर शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. शेतीची उत्पादकता वाढावी व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, हा उद्देश ठेवून कारखान्याची वाटचाल सुरू आहे.
- सुधीर पाटील, शेती अधिकारी, हेमरस
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57525 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..