
आजरा तालुक्यामध्ये पाच गावात सीड बॅंके
आजरा तालुक्यामध्ये
पाच गावात सीड बॅंक
वनअमृत योजना; महिला बचत गटांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १२ : वनअमृत योजनेंतर्गत तालुक्यातील पाच गावात सीड बॅंकेचा प्रयोग राबविला जाणार आहे. गतवर्षी तालुक्यातील तीन गावात सीड बॅंकेचा पहिला प्रयोग झाला होता. तो यशस्वी झाल्याने नव्याने दोन गावांचा यामध्ये समावेश केल्याने याची आता व्याप्ती वाढणार आहे. महिला बचत गटांनी यासाठी पुढाकार घेतला असून, देशी वाण संवर्धन व संरक्षण या चळवळीला आता गती येत आहे, अशी माहिती आजरा तालुका अभियान प्रभाग समन्वयक शांताराम कांबळे यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन्नोनती ग्रामीण अभियानांतर्गत महिला बचत गटांच्या पुढाकाराने गतवर्षीपासून देशीवाण संवर्धन व संरक्षणाचे काम सुरू झाले आहे. वनअमृत योजनेंतर्गत तालुक्यातील देवकांडगाव, साळगाव व दाभिल या गावात याबाबतचा प्रयोग राबविण्यात आला. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, तो यशस्वी देखील झाला आहे. याची व्याप्ती यंदापासून वाढवली जाणार असून, आवंडी धनगरवाडा, त्याचबरोबर गवसे किंवा किटवडे या दोन नव्या गावांचा समावेश होत असून, यंदा पाच गावांत हा प्रयोग होणार आहे. वनविभाग व शिवाजी विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा प्रयोग होत आहे. जमीन व लागवडीसाठीचे क्षेत्र व मनुष्यबळ हे महिला बचत गट उपलब्ध करून देणार आहेत. वनविभागातर्फे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. गतवर्षी देवकांडगाव येथे महिला बचत गटातील २१ महिलांनी २३ प्रकारच्या देशी वाणाची लागवड प्रत्येकी दहा गुंठ्यावर केली होती. साळगाव व दाभिलमधील महिला बचतगटातील सदस्यांनी लागवड केली होती. यंदा याची व्याप्ती वाढवली जाणार असून देवकांडगाव, साळगाव, दाभिलसह आवंडी धनगरवाडा, गवसे किंवा किटवडे या गावात हा प्रयोग होणार आहे. वनविभागाचे उपजीविका तज्ज्ञ योगेश फोंडे, शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती विभागाचे प्रा. डॉ. एन. बी. गायकवाड, तालुका अभियान व्यवस्थापक अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग होतील.
--------------
चौकट
तीसहून अधिक वाणांची लागवड
गतवर्षी तीन गावांत २३ प्रकारच्या भाताच्या देशी वाणाची लागवड करण्यात आली होती. यंदा यामध्ये वाढ होणार असून, तीसहून अधिक देशी वाणांची लागवड होणार असल्याचे आजरा तालुका अभियान प्रभाग समन्वयक कांबळे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57566 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..