
आम्ही रिक्षा एक लिटर पाण्यातच धूणार!
लोगो- चला, पंचगंगा वाचवूया!
२१४०१
कोल्हापूर ः ‘सकाळ’तर्फे एक लिटर पाण्यात वाहन कसे धुवायचे, याचे प्रात्यक्षिक गुरुवारी दाखवण्यात आले. त्यानंतर रंकाळा चौपाटी रिक्षा मंडळच्या सदस्यांनी एकत्र तसा निर्धार केला. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
वाढावा फोटो.........
कोल्हापूर ः एक लिटर पाण्यात रिक्षा कशी धुवावी, याबाबत अनिल चौगुले यांनी रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले.
आम्ही रिक्षा एक लिटर पाण्यातच धुणार!
रंकाळा चौपाटी रिक्षा मंडळाचा निर्धार; ‘सकाळ’, निसर्ग मित्र, कॉमन मॅनचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः रिक्षा धुण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करणार; आम्ही रिक्षा एक लिटर पाण्यातच धुणार, असा निर्धार आज येथील रंकाळा चौपाटी रिक्षा मित्र मंडळाने केला. ‘सकाळ’ने सुरू केलेल्या ‘चला पंचगंगा वाचवूया’ या अभियानांतर्गत रिक्षाचालकांना एक लिटर पाण्यात रिक्षा कशी धुवायची याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले. निसर्ग मित्र संस्था आणि कॉमन मॅन रिक्षा संघटना यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी रिक्षाचालकांना निसर्ग मित्र संस्थेतर्फे पाणी वाचवण्याचा संदेश देणारे प्रबोधन पत्रकही देण्यात आले.
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘सकाळ’ने चला ‘पंचगंगा वाचवूया’ ही मोहीम सुरू केली. या अंतर्गत नागरिकांमध्ये पाणी वाचवणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करणे याबाबत विविध स्तरावर प्रबोधन केले जात आहे. मुळातच सांडपाणी कमी तयार झाले तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरील ताण कमी होईल. शहरात वाहने धुण्यासाठी पाण्याचा बेसुमार वापर होतो. रिक्षाचालक दररोज सकाळी रिक्षा धुतात. त्यासाठीही पाण्याचा मोठा वापर होतो. पाण्याचा जाणीवपूर्वक कमी वापर केला तरी रिक्षा चांगल्या प्रकारे स्वच्छ करता येते, याचे प्रात्यक्षिक आज रिक्षाचालकांना दाखवण्यात आले.
यावेळी पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड म्हणाले, ‘कोल्हापुरातील रिक्षाचालक हक्क आणि कर्तव्याबाबत जागरूक आहेत. त्यांनी मोर्चा काढला की महापालिका रस्ते करते. टोलचा लढा असो किंवा अन्य नागरी समस्या असो कोल्हापुरातील रिक्षा चालक नेहमीच अग्रेसर असतात. वाहन धुण्यासाठी कमी पाण्याचा वापर करणे, ही भावना समाजात निर्माण करण्याचे काम कोल्हापूरचे रिक्षाचालकच करू शकतात. रिक्षा कमी पाण्यात धुता येते; मग घरातील चारचाकी का नाही? रिक्षाचालक आपल्या कृतीतून याचे उत्तर समाजाला देतील.’
यावेळी निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी रिक्षाचालकांना एक लिटर पाण्यात रिक्षा कशी धुवायची, याचे प्रात्यक्षिक दाखवले. ते म्हणाले, ‘सुरुवातीला रिक्षा बाहेरून आणि आतून कोरड्या फडक्याने नीट पुसून घ्यावी. त्यामुळे धुळ, माती निघून जाते. त्यानंतर एक लिटर पाण्याच्या बाटलीला स्प्रे लावावा. स्प्रेने रिक्षावर पाणी मारावे. त्यानंतर चिमॉस कापडाने रिक्षा पुसून घ्यावी. हे कापड पाणी शोषून न घेता ते त्या पृष्ठभागावर पसरवते. त्यामुळे कमी पाण्यात रिक्षा स्वच्छ होते. चिमॉस कापड स्वस्त असून रिक्षाचे स्पेअर पार्ट मिळणाऱ्या दुकानात हे कापड उपलब्ध असते. अशाप्रकारे रिक्षा धुतल्याने कमी वेळात आणि कमी पाण्यात रिक्षा स्वच्छ होते. रिक्षावरील मातीचे किंवा अन्य डागही निघून जातात.’
यावेळी खंडू घाटगे, दीपक गायकवाड, अविनाश दिंडे, नरेंद्र पाटील, जाफर मुजावर, नागेश साळोखे, संपत खदने, आनंद बोडके, बाबूराव पठाडे यांच्यासह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्यासाठी रिक्षा म्हणजे घरातील सदस्यांप्रमाणेच असते. त्यामुळे रिक्षा स्वच्छ आणि टापटीप असावी, यासाठी आम्ही ती रोज धुतो. आजपासून एक लिटर पाण्यातच रिक्षा स्वच्छ करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. यामुळे पाण्याची बचत होईलच; पण पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या चळवळीत आमचाही वाटा असल्याचे समाधान मिळेल.
- श्रीकांत पाटील, माजी अध्यक्ष, कॉमनमॅन रिक्षा संघटना
कोल्हापूरच्या हितासाठी रिक्षाचालक नेहमीच एक पाऊल पुढे असतात. ‘सकाळ’ने सुरू केलेल्या नदी प्रदूषणमुक्त अभियानात आम्ही आमच्या परीने योगदान देऊच; पण एक लिटर पाण्यात रिक्षा स्वच्छ करून शहरातील वाहनधारकांनाही यासाठी प्रोत्साहित करू.
- अविनाश दिंडे, अध्यक्ष, कॉमनमॅन रिक्षा संघटना
रंकाळा चौपाटील रिक्षा मित्र मंडळातर्फे आम्ही एक लिटर पाण्यात वाहने धुवा, या संकल्पनेचा प्रचार व प्रसार करू. तसेच रिक्षातील प्रवाशांचेही याबाबत प्रबोधन करू.
- आनंद जगताप, अध्यक्ष, रंकाळा चौपाटी रिक्षा मित्र मंडळ
चौकट
पाण्याचा अपव्यय टाळूया
पाण्याचा अपव्यय टाळून रिक्षाबरोबरच इतर वाहने धुण्यावर काही सजग नागरिकांनी यापूर्वीपासूनच भर दिला आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करूनही वाहने धुता येतात, याबाबतची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी अशा निवडक प्रयत्नांना ‘सकाळ''मधून प्रसिद्धी दिली जाणार आहे. त्यासाठी माहिती व फोटो पाठवा या व्हॉटस् ॲप क्रमांकावर (९१४६१९०१९१)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57589 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..