‘टेंडर’ची इर्षा विकासाच्या मूळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘टेंडर’ची इर्षा विकासाच्या मूळावर
‘टेंडर’ची इर्षा विकासाच्या मूळावर

‘टेंडर’ची इर्षा विकासाच्या मूळावर

sakal_logo
By

21404
गडहिंग्लज नगरपालिका

‘टेंडर’ची ईर्षा विकासाच्या मुळावर
गडहिंग्लज नगरपालिका; कमी दराच्या निविदेची सहा कामे सुरूच नाहीत
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : राजकीय ईर्षा किती असावी यालाही मर्यादा आहेत. विकासात राजकारण आणू नये, हे तत्त्‍व केवळ भाषणातून सांगितले जाते, मात्र गडहिंग्लजमधील विकासकामांची निविदा भरण्यातील राजकीय ईर्षा आता विकासाच्या मुळावर उठली आहे. या ईर्षेतून कमी दराने भरलेल्या निविदा मंजूर झाल्या. परंतु, आता तिच कामे परवडत नाहीत म्हणून ठेकेदार कामाचा आदेशही नेण्यासाठी फिरकलेला नाही. गडहिंग्लजच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच झाल्याचे सांगितले जाते.
नगरपालिकेत ज्याची सत्ता असते, त्यांच्याच कार्यकर्त्यांना विविध कामांचे ठेके मिळत असल्याचे आजपर्यंत पहायला मिळते. हा प्रकार सर्वत्रच आहे. यापूर्वी पालिकेत कोणाकोणाची सत्ता होती, त्या सर्वांच्या कालावधीत असेच घडत आले. दरम्यान, गेल्या सभागृहाची मुदत संपत असताना मंजूर झालेल्या विकास निधीतून करावयाच्या कामांची निविदा प्रशासक आल्यानंतर प्रसिद्ध झाली. यामध्ये रस्ते खडीकरण-डांबरीकरण, काँक्रीट गटारी, सौर ऊर्जा प्रकल्प राबविणे, ओढ्यावर साकव बांधणे, नाल्याच्या एका बाजूला बांधकाम अशा महत्त्‍वाच्या कामांचा समावेश आहे.
या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीसाठी लागणारे सर्व सोपास्कार त्यावेळच्या सभागृहाशी संबंधित ठेकेदारांनी पूर्ण केल्या होत्या. परंतु त्यांच्या कार्यकालात निविदा प्रसिद्ध झाली नव्हती. प्रशासकाच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या निविदेची संधी साधत काही विरोधकांनी जवळच्या ठेकेदारांना सांगून कमी दराने निविदा भरण्यास भाग पाडले. या सांगण्यावरून कमी दराने निविदाही भरल्या गेल्या. त्या मंजूरही झाल्या. परंतु तेच ठेकेदार आता या दरात काम परवडत नाही म्हणून महिना उलटला तरी कामाचा आदेशही नेण्यास आलेले नाहीत. मुळात साकव, रस्ते, गटारी, नाला बांधकाम ही कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक होते. आता ठेकेदारांनी हात वर केल्याने ही कामे इतक्या कमी वेळेत कशी होणार, हा प्रश्‍न आहे. केवळ ईर्षेपोटी झालेला हा प्रकार शहर विकासाच्या मुळावर उठल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
------------------
चौकट...
‘बांधकाम’ची टिपणी
कामाचा आदेश नेण्यास या, असे बांधकाम विभागाकडून वारंवार कळवूनही ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे. केवळ एक ठेकेदार काम करण्यास तयार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र उर्वरित सहा कामांचे ठेकेदार आलेले नाहीत. यामुळे बांधकाम विभागाने पुढील वर्षभर संबंधित ठेकेदारांना कामे न देण्याची टिपणी तयार केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. आता संबंधित ठेकेदारांची भूमिका काय राहणार, ते कामच करण्यास तयार नसतील, तर प्रशासन फेर निविदा प्रसिद्ध करणार का, या प्रक्रियेत व विकासकामे पूर्तीसाठी होणाऱ्या विलंबाला कोण जबाबदार, त्या ठेकेदारांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेणार हे सारे प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57625 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top