
फुलेवाडीचा शेवटच्या क्षणी गोल
फोटो
21422
फुलेवाडीचा शेवटच्या क्षणी गोल
शिवाजी मंडळाविरुद्धची लढत बरोबरीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. १२ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज फुलेवाडीने शिवाजी तालीम मंडळाच्या गोलची अक्षरशः शेवटच्या मिनिटाला फेड करून बरोबरी साधली. यामुळे दोन्ही संघाना एक-एक गुण मिळाल्याने स्पर्धेतील अव्वल स्थानासाठी आता पुन्हा चुरस निर्माण झाली आहे. फुलेवाडीच्या कपिल पाटीलने कॉर्नर किकवर मिळालेल्या पासवर गोल नोंदवत ही बरोबरी साधली.
पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. साखळी फेरीत शिवाजी तरुण मंडळ व फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात लढत झाली. सामन्यात दोन्ही संघ सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले होते. शिवाजी मंडळाच्या करण चव्हाण-बंदरे, संकेत साळोखे, रणवीर जाधव, संकेत साळोखे, शुभम साळोखे, ऋतुराज सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट खेळ करत चढाया केल्या. सामनाच्या सहाव्या मिनिटासच करण चव्हाण बंदरे याने संकेत साळोखेच्या पासवर पहिला गोल नोंदवला आणि संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर फुलेवाडीकडून साहिल पेंढारी, तेजस जाधव, विराज साळोखे, चंदन गवळी, अजय जाधव यांनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगवान चढाया करूनही त्यात यश आले नाही.
उत्तरार्धात १ -० अशी आघाडी घेऊनच शिवाजी मंडळाचा संघ मैदानात उतरला. फुलेवाडीच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. निर्धारित वेळेनंतर मिळलेल्या वाढीव तीन मिनिटात गोल फिटणार नाही, अशा अविर्भावात ढिलाईने खेळणाऱ्या शिवाजी मंडळाला अगदी अखेरच्या मिनिटाला धक्का बसला. कॉर्नर किकवेळी मिळालेल्या संधीचा अचूक वेध घेत फुलेवाडीच्या कपिल पाटील याने चेंडू जाळ्यात ढकलला आणि अक्षरशः शेवटच्या मिनिटाला बरोबरी साधली. फुलेवाडीच्या चंदन गवळी याला सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
आजचा सामना
सायंकाळी चार : दिलबहार विरुद्ध फुलेवाडी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57662 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..