
अमेरिकन बंगलो पुनर्विलोकन नोटीस
अमेरिकन बंगलोच्या
जमिनीसाठी २० रोजी सुनावणी
मनपासह १२ जणांना हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१२ ः जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील अमेरिकन बंगलोच्या तक्रार अर्जावरील सुनावणीची नोटीस आज त्या जागेवर बजावली आहे.
या नोटिशीमुळे जमिनीसंदर्भात कोणालाही जिल्हाधिकारी यांच्या दालनात शुक्रवारी (ता.२०) सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या सुनावणीत बाजू मांडता येणार आहे. तसेच जमिनी संबंधित महापालिकेसह १२ व्यक्तीं-संस्थांना यापूर्वीच १८ एप्रिलला नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांनाही सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकन बंगलो सि.स.नं. २५९ अ- ई वॉर्ड येथील मिळकतीबाबत दिलीप देसाई यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे. नोटिशीद्वारे संबंधितांना आवश्यक दस्तऐवज, किंवा पुरावा सादर करण्याची संधी दिली आहे. नोटिशीनुसार स्वतः किंवा योग्यरितीने प्राधिकृत अभिकर्त्यामार्फत हजर राहता येणार आहे. हजर न राहिल्यास तुमच्या अनुपस्थितीत निर्णय करण्यात येईल, असे नोटिशीत म्हटले आहे. अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या सहीने या नोटिसा पाठविल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांच्यासह महापालिकेचे सहायक संचालक नगररचना अधिकारी, नगरभूमापन अधिकारी, तहसील करवीर आणि सह जिल्हा निबंधक वर्ग-१ याच बरोबर जागेशी संबंधित कोल्हापूर, सांगली, इंदोर, पुणे येथील संबंधित संस्था आणि व्यक्तींना अशा १२ जणांना या नोटिसा पाठविल्या आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम २०(२) प्रमाणे ही सुनावणी होत आहे. कोल्हापूर शहर येथील नगरभूमापन क्रमांक २५९ अ ई वॉर्ड या मिळकतीवरील ‘ब’ सत्ताप्रकार कमी करण्याबाबत पारित झालेला ८ एप्रिल २०१०चा आदेश पुनर्विलोकनात जिल्हाधिकारी यांच्याकडून नोटीस पाठविली आहे. मिळकतीत वाद व हितसंबंधित असल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार नोटीस दिली आहे. तक्रार अर्जाचा निर्णय करण्यासाठी चौकशी करण्यात येत असल्याचेही नोटिशीत म्हटले आहे.
-------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57686 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..