
दोनशे कलाकारांची आज लोककलेतून आदरांजली
कृतज्ञता पर्व लोगो
शाहू मिलमध्ये अवतरणार
आज भारतीय लोकसंस्कृती
--
१२ राज्यांतील २०० कलाकारांची आज आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः देशभरातील १२ राज्यांतील दोनशेहून अधिक लोककलाकार शनिवारी (ता. १४) सकाळी लोकराजा राजर्षी शाहूंना आदरांजली वाहणार आहेत. ऐतिहासिक भवानी मंडपातून सकाळी आठ वाजता सर्व कलाकार पारंपरिक वेशभूषेत एकवटतील आणि तेथून मिरवणुकीने राजर्षी शाहू समाधिस्थळावर येऊन राजर्षी शाहूंना आदरांजली वाहतील. सलग दोन दिवस सायंकाळी सहा वाजता शाहू मिलमध्ये लोककला सादरीकरण होणार असल्याची माहिती आज नागपूर येथील दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे लेखा अधिकारी दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता पर्व आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन दिवस रंगणाऱ्या या लोककला सादरीकरणासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, काश्मीर, गुजरात, आसाम, हरियाणा, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील कलाकारांचा समावेश आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदींच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.
पत्रकार परिषदेला मुंबईचे प्रसिद्ध कोरिओग्राफर अरविंद रजपूत, नीलेश रजपूत, कृतज्ञता पर्व समितीचे उदय गायकवाड, प्रमोद पाटील, ऋषिकेश केसकर, प्राचार्य डॉ. महादेव नरके, आदित्य बेडेकर, शाम बासराणी, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, जिल्हा प्रशासन, कृतज्ञता पर्व समिती, शिवशाहू फौंडेशन, शाहू फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
लावणी, गुदूम बाजा,
भांगडा अन् सिटुरी धमालही...
महाराष्ट्राची लावणी, पोवाडा, धनगरी गजा, सोंगी मुखवटे, मध्य प्रदेशचा गुदूम बाजा, छ्त्तीसगडचे पंथी नृत्य, पंजाबचे भांगडा नृत्य, काश्मीरचे रोफ नृत्य, गुजरातचे सिटुरी धमाल, आसामचे बिहू नृत्य, हरियाणाचे घुमर, कर्नाटकचे हालाकी सुग्गी कुनिथा आदी कलाविष्कार सादर होतील. शनिवारी (ता. १४) आणि रविवारी (ता. १५) सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ या वेळेत हे सादरीकरण होईल. कार्यक्रमाला सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57834 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..