
नोकर भरती प्र्रक्रियेबाबत अनेक प्रश्न
नोकर भरतीकडे लाखो उमेदवारांचे लक्ष
जिल्हा निवडपेक्षा लोकसेवा आयोगालाच पसंती; पारदर्शी प्रक्रियेची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : राज्यात गट ‘क'' व गट ‘ड'' वर्गाची नोकर भरती करण्याची घोषणा केली आहे. दोनच दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या १० हजार पदांच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली. उर्वरित रिक्त जागांवर भरती करत असताना विभागीय स्तरावर सुधारित आकृतीबंध मंजूर करुन ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मधल्या काळात खासगी कंपन्यांनी नोकर भरतीत गोंधळ घातला. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीकडून नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यातील विविध विभागांच्या रिक्त जागा, त्यासाठी येणारे अर्ज, उमेदवारांना द्यावी लागणारी फी, पारदर्शकता व यंत्रणेवरील ताण पाहता ही परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
अनेक वर्षांनंतर राज्यात मेगा नोकर भरती सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काही वर्षांत रिक्त जागांची संख्या ७१ हजार सांगितली जात होती. यात मागील चार वर्षांत भरच पडली आहे. कोरोनामुळे बेकारी वाढली आहे. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांना आशेचा किरण दिसत आहे. शासनाने जरी नोकर भरतीची घोषणा केली असली तरी यंत्रणा विश्वासू असावी, अशी एकमेव मागणी होत आहे. यापूर्वी खासगी कंपन्यांनी नोकर भरती करत असताना घोटाळा केला. त्यामुळे प्रामणिक उमेदवारांवर अन्याय झाला. यावेळी अशी परिस्थिती येवू नये, अशी उमेदवारांची अपेक्षा आहे.
राज्य शासनाने यावेळी नोकर भरतीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपवली आहे. जिल्ह्यात जेवढी शासकीय कार्यालये आहेत, तेवढ्या ठिकाणच्या रिक्त जागांवर भरती होणार आहे. जिल्हा परिषदेत तर आठ ते दहा विभाग आहेत. याचबरोबर उद्योग, शिक्षण, महसूल, सहकार, पाटबंधारे, वन, बांधकाम अशा डझनभर विभागांत नोकर भरती होणार आहे. एकाच जिल्ह्यात हजारो पदे रिक्त असून ३६ जिल्ह्यांत अशीच कमी, अधिक अवस्था आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षेसाठी, प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा अर्ज भरणे, त्यासाठीची हजारो रुपये फी भरणे व एवढे करुन परीक्षांच्या तारखा एक आल्या तर गोंधळ होणार आहे. एकाच उमेदवाराची विविध पदांवर निवड झाली तर पुन्हा रिक्त जागांचा प्रश्न होणार आहे. त्यामुळे एकाच अर्जावर उमेदवारांना या मेगा भरतीत सहभागी कसे होता येईल, यासाठी प्रयत्न करावा,अशी मागणी होत आहे.
प्रत्येक जिल्ह्यात रिक्त जागांचे प्रमाण कमी,अधिक आहे. एकच उमेदवार अनेक परीक्षांना पात्र ठरु शकतो. अशावेळी संबंधित उमेदवाराला पात्र असणाऱ्या सर्व परीक्षा देण्याची संधी मिळणार का? की, एका उमेदवारास एकच अर्ज भरता येणार? याबाबतचा संभ्रम आहे. मागील परीक्षांतील गोंधळ पाहता ही परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाने घ्यावी.
-अनिकेत पाटील, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57886 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..