
कॉंग्रेस बैठक
21655
प्रशासनाच्या कामाचे काढले वाभाडे
महापालिका माजी पदाधिकाऱ्यांची बैठक; थेट पाईपच्या स्काडाची होणार चाचणी
कोल्हापूर, ता. १३ : शहरातील कचरा उठावाचे नियोजन कोलमडले आहे. बऱ्याच खांबांवरील एलईडी लाईट बंद आहेत. नगररचना विभागात ठराविक लोकांचीच कामे होतात. सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात, अशा उणिवा दाखवत महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आज प्रशासनाच्या कामाचे वाभाडे काढले. यानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सहाय्यक आयुक्त व मुख्य आरोग्य निरीक्षक दोन दिवस फिरती करून कचरा उठाव, ड्रेनेज लाईन स्वच्छतेबाबत नियोजन करतील, असे सांगितले. तसेच थेट पाईपलाईनमधील पुईखडी येथील डब्ल्यूटीपी व स्काडाचे काम पूर्ण झाले असून, चाचणीचे नियोजन केल्याची माहिती प्रशासनाने दिली.
विविध प्रश्नांबाबत माजी पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ. बलकवडे यांच्या उपस्थितीत आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी थेट पाईपलाईन, पावसाळ्यापूर्वीचे ड्रेनेज व्यवस्थापन, कचरा उठाव, स्ट्रिट लाईट, घरफाळा, वर्कशॉप विभाग व नगररचना विभागाचा आढावा घेतला. जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी थेट पाईपलाईनमधील बीपीटी टँकचे काम पूर्ण झाले असून, पायऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. ७२ पैकी ५० व्हॉल्व्ह बसवले आहेत. जॅकवेलचे काम प्रगतिपथावर आहे. महिनाअखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वीज वाहिन्यांचे १९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले.
ड्रेनेज प्रभागात कामासाठी जेट मशीन मिळत नाही. आतापर्यंत ड्रेनेज लाईनचे किती टक्के काम पूर्ण झाले. चोकअप काढण्यासाठी लागणारे रॉड दोन वर्षे सांगूनही खरेदी केलेले नाहीत. ड्रेनेज सफाईसाठी विशेष पथक तयार करावे, अशा सूचना माजी गटनेते शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर संजय मोहिते व अर्जुन माने यांनी केल्या.
सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे यांनी चोकअप काढण्यासाठी विशेष दोन टीम तयार केल्या आहेत. मुंबईच्या धर्तीवर मोठी सक्शन गाडी भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
शहरातील कचरा उठावाचे नियोजन कोलमडले आहे. उपनगरामध्ये कचरा रस्त्यावर साचत आहे. टिप्परच्या दोनवर फेऱ्या होत नाही. त्यामुळे कचरा प्रक्रियेचे विकेंद्रीकरणाबाबत काही झाले नाही. बऱ्याच खांबांवरील एलईडीसाठी ब्रॅकेट नसल्याने लाईट बंद आहेत. नवीन घरफाळा लावण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष कॅम्प घेऊन हेलपाटे मारायला लावू नका. एका शाळेत एकाच ठेकेदारामार्फत जेवणाचा पुरवठा व्हावा. शहर विकास आराखड्याची निविदा अद्याप का प्रलंबित ठेवली आहे. वृक्षगणनेसाठी ८५ लाखांची निविदा काढली आहे. मागील ५८ लाखांच्या काढलेल्या निविदेच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमली आहे. अद्याप कोणताही अहवाल मिळालेला नाही. पुन्हा ८५ लाखाची निविदा कशासाठी काढली, अशी विचारणा पदाधिकाऱ्यांनी केली.
डॉ. बलकवडे यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे संबंधित खातेप्रमुखांनी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. राहुल चव्हाण, सचिन पाटील, भूपाल शेटे, विनायक फाळके, आशपाक आजरेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव, करनिर्धारक व संग्राहक वर्षा परीट, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57931 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..