
जैन सभा शोभायात्रा
24248
ढोलांचा गजर अन् लेझीमचा ताल!
दक्षिण भारत जैन सभेच्या शताब्दी अधिवेशनाची शोभायात्रा ठरली लक्षवेधी
सांगली, ता. १३ ः दक्षिण भारत जैन सभेच्या यंदाच्या त्रैवार्षिक शताब्दी अधिवेशनानिमित्त आज (ता. १३) काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. ढोल-ताशे, लेझीम, कर्नाटकचे वीर कथेनृत्य, चित्ररथ यांनी सांगलीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अहिंसा आणि शांतीचा संदेश देत निघालेल्या या शोभायात्रेने उद्यापासून (ता. १४) होणाऱ्या दोन दिवसांच्या अधिवेशनाचे वातावरण भारावून टाकले. जैन समाजाने त्यात उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध समाजांतील संस्थांनी शोभायात्रेचे स्वागत करत सामाजिक एकजुटीचे दर्शन घडवले.
दक्षिण भारत जैन सभेचे शताब्दी महाअधिवेशन येथील नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जैन समाजाची वैभवशाली परंपरा सांगणारी शोभायात्रा काढण्यात आली. रा. ध. दावडा जैन बोर्डिंगपासून शोभायात्रेला सुरवात झाली. स्वरूपा पाटील-यड्रावकर, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील आणि कार्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी झेंडा दाखवला. मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार सागर वडगावे, शोभायात्रा संयोजक मोहन नवले, प्रा. एन. डी. बिरनाळे, सचिन पाटील, डॉ. अण्णासाहेब चोपडे, राजेंद्र झेले, दादा पाटील, अभय पाटील, अविनाश पाटील, जयपाल चिंचवाडे आदी प्रमुख उपस्थित होते.
कर्नाटक राज्याचे शिमोगा वीर कथेनृत्य अव्दितीय होते. स्नेह ज्योत महिला ढोल पथक, नऊवारी साडीमध्ये दुधगावचे वीर महिला मंडळ लेझीम पथक, राजमती महिला मंडळ लेझीम पथक, राजमती योग पार्कचे मोहन कवठेकर व अर्चना कवठेकर; शैलेश कदम, विनायक रामदुर्ग यांचे योगा प्रात्यक्षिक, वीराचार्य विद्यामंदिर सावळवाडी व श्रीमती पाटील हायस्कूल नांद्रे यांचे मुलांचे लेझीम पथक, वीरसेवा दल शाखा कसबे डिग्रज व देसाई इंगळी यांचे झांज पथक, चिंचवाड हायस्कूल चिंचवाड यांचे शाहू महाराज, आण्णासाहेब लठ्ठे, कर्मवीर भाऊराव पाटील जीवनपट, दक्षिण भारत जैन सभेच्या संस्थापक व्यक्तींचे जीवनपट चित्ररथ, राजमती गर्ल्स हायस्कूलचा भगवान आदिनाथ ‘स्त्रीशिक्षण’ चित्ररथ, जैन महिला परिषदेचा चित्ररथ, वीराचार्य आयटीआयचा ‘आयटीआय मॉडेल’, सांगली हायस्कूल सांगलीचा ‘राष्ट्रीय एकात्मता चित्ररथ’, रुई व जयसिंगपूर येथील महिला मंडळाचा चित्ररथ, समडोळी महिला मंडळाने पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला.
------------
चौकट -
महिलांचा उत्साह उदंड
जैन समाजातील महिलांनी ढोल, लेझीमच्या तालावर ठेका धरत शोभायात्रा गाजवली. मोठ्या संख्येने समाजातील महिला सहभागी झाल्या. शाळकरी मुलांनी सहभाग घेतला. ट्रॅक्टरवर सजवलेल्या चित्ररथांनी सांगलीकरांचे लक्ष वेधून घेतले. त्यात सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान दिलेल्या महिलांच्या रूपात ज्येष्ठ महिलांनी सहभाग घेतला. वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, महिला परिषद जैन महिलाश्रम, जैन बोर्डिंगमधील सर्वांनी त्यात हिरिरीने सहभाग नोंदवला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57982 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..