
बस चालकाचे प्रसंगावधान
केएमटी बसचा ब्रेक फेल
स्वयंमभू गणेश मंदिर चौकातील थरार; चालकाचे प्रसंगावधान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः केएमटी बसचा ब्रेक अचानक निकामी झाला. तशी प्रवाशांच्यात एकच घबराट उडाली. बसचालकाने प्रसंगावधान राखत बस रस्ता दुभाजकावर नेऊन थांबवली. तसा सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. गजबजलेल्या लक्ष्मीपुरीतील स्वयंमभू गणेश मंदिर चौकात सायंकाळी हा थरार घडला.
याबाबत केएमटी विभागाकडून मिळालेली माहिती अशी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगरातून सायंकाळी पाचच्या सुमारास केएमटी बस महाराणा प्रताप चौकात आली. येथून ही बस पुढे पेठवडगावला जाण्यासाठी निघाली. यामध्ये सुमारे ६० प्रवासी होते. स्वयंभू गणेश मंदिर चौकात सिग्नलला वाहने मोठ्या संख्येने थांबली होती. त्याचवेळी या मार्गावरून जाणाऱ्या या केएमटी बसच्या ब्रेकची एअर अचानक उतरली आणि तो निकामी (फेल) झाला. चालक सुरेंद्र बापू संत यांच्या हे लक्षात आले. त्यांनी गिअरच्या आधारे बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वर्दळ नसल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही वेळ वाया न घालवता बस रस्ता दुभाजकावर घातली. त्यामुळे बसचा वेग मंदावला, ही बस पुढं नेत अखेरीस थांबवली. बसमधील गोंधळलेले आणि घाबरलेले प्रवासी बस थांबताच त्यातून लागलीच बाहेर पडले. चालक संत यांनी अचानक ओढवलेल्या संकटावर धाडसाने आणि चतुराईने मात केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58004 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..