
गोकुळ
‘गोकुळ’च्या उलाढालीत ३७८ कोटींची वाढ
---------------
विश्वास पाटील : काटकसरीतून वर्षात ९ कोटी ६८ लाखांची बचत
कोल्हापूर, ता. १४ : गोकुळ दूध संघात सत्तांतर झाल्यापासून संघाची वार्षिक उलाढाल २९२९ कोटींपर्यंत झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ३७८ कोटींची वाढ आहे. वर्षात म्हैस दूध खरेदी दरात ४ रुपये व गाय दूध दरात २ रुपयांची दूध दरवाढ दिली आहे. तर, टॅंकर भाडे कपात, अतिरिक्त कर्मचारी कपात, पशुखाद्य वाहतूक भाडे कपातीसह इतर काटकसरीच्या कारभारातून वर्षात ९ कोटी ६८ लाखांची बचत केल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज दिली.
गोकुळच्या वर्षाच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी ताराबाई पार्क येथील कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील ६ हजार ५६४ दूध संस्थांतून वर्षाला ४९ कोटी ९५ लाख ३८ हजार ५१६ लिटर दूध संकलन होत होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५ कोटी ३३ लाख ६ हजार २७५ लिटर्सने वाढ झाली आहे. यावर्षी प्रतिदिन दूध संकलन १३ लाख ६८ हजार लिटर झाले. गतवर्षीच्या तुलनेते प्रतिदिन १ लाख ४६ हजार लिटर दूध वाढले. भविष्यात २० लाख लिटर दूध संकलनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या वेळी संचालक अरुण डोंगळे, युवराज पाटील, अजित नरके, किसन चौगले, शशिकांत पाटील, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, अंबरिशसिंह घाटगे, बाबासाहेब चौगले आदी उपस्थित होते.
.....
* अशी केली काटकसर :
* पुणे-मुंबई दूध वाहतूक टॅंकर भाडे कपात : ५ कोटी ८ लाख
* अतिरिक्त रोजंदारी कर्मचारी कपात : १ कोटी ७८ लाख
* महानंद दूध पॅकिंग बचत : ६५ लाख
* पशुखाद्य वाहतूक भाडे कपात : १ कोटी ७५ लाख
* अभियांत्रिकी विभागाकडून विविध प्रकल्पातून : ४२ लाखांची बचत
* एकूण ९ कोटी ६८ लाखांची बचत केली आहे.
---
१७ हजार ७१६ टन पशुखाद्य विक्री
पशुखाद्य विक्रीत २०२०-२१ मध्ये १ लाख २० हजार ८८८ टन तर २०२१-२२ मध्ये १ लाख ३८ हजार ६५४ टन पशूखाद्याची विक्री केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेते यावर्षी १७ हजार ७१६ टन जादा विक्री झाली आहे.
....
ठळक मुद्दे :
* दूध खरेदी दरात दोनवेळा वाढ
* विस्तारासाठी भोकरपाडा खोपोली येथे १२ एकर जागा खरेदी प्रस्ताव
* मुंबई वाशी शाखा विस्तारणीकरण
* नवीन पेट्रोल पंपास मान्यता मिळाली
* म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम राबवणार
* मेडिकल ग्रेड ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यान्वित
* भारतीय नौदल सेना कारवार यांना सिलेक्ट टेट्रापॅक दूध पुरवठा
* गोकुळ बासुंदी नवीन उत्पादन
....
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58139 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..