
रंग- वारसा
21775
जगभरात १९१४ मध्ये
झळकली कोल्हापूरची बातमी
सन १९१४ मध्ये जगातल्या प्रमुख देशातल्या वृत्तपत्रांत कोल्हापूरसंदर्भात एक बातमी झळकली आणि कोल्हापूरचे नांव अचानकपणे चर्चेत आलं. बातमी होती ती पुतळ्यांच्या विद्रुपीकरणाची; पण हे पुतळे सामान्य व्यक्तींचे नव्हते. शिवाय एखाद दुसरा पुतळा फोडला गेला नव्हता, तर पाच सहा पुतळ्यांची एकाच वेळेस नासधूस करण्यात आली होती. हे पुतळे होते इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया आणि तिच्या कुटुंबीयांचे! त्यामुळे या प्रकरणाची वाच्यता साऱ्या जगभरात झाली.
सुरुवात पुतळ्यांच्या स्थापनेासूनच करू. शाहू महाराज आणि ब्रिटिश सरकार यांच्यात नेहमीच सख्य राहिलं होतं. या मैत्रीचं प्रतीक म्हणून शाहू महाराजांनी विक्टोरिया राणीचा पुतळा त्याच्या सुंदर अशा मेघडंबरीसह शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या बागेत बसवला होता. १९०८ मध्ये मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क याच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. विशेष म्हणजे शाहू महाराजांच्या राजकन्येच्या लग्नाचाच हा दिवस होता. पुढे १९११ मध्ये इंग्लंडचा राजा अल्बर्ट एडवर्ड मृत्यू पावल्यावर एक श्रध्दांजली सभा टाऊन हॉलमध्ये भरली आणि त्या सभेत शाहू महाराजांनी या अल्बर्ट एडवर्डचा सपत्नीक पुतळा विक्टोरियाशेजारीच बसवण्याचा हुकूम जारी केला. या अल्बर्ट एडवर्डच्या राज्यारोहणप्रसंगी १९०१ मध्ये शाहू महाराज इंग्लंडला गेले होते, त्यावेळी त्यांचे या राजपरिवाराशी मैत्र निर्माण झाले होते. यामुळे अल्बर्ट एडवर्ड आणि राजपरिवारातले इतर असे सहा पुतळे या विक्टोरिया शेजारी १९१३ मध्ये बसवण्यात आले. दगडी बांधनीचा हौद, कारंजा आणि गर्द झाडी असलेल्या बागेत हे पुतळे बसवले. बागेचं नाव प्रिन्सेस गार्डन. आजच्या काळातलं नाव क्रांती उद्यान.. चिमासाहेब महाराजांचा पुतळा टाऊन हॉल शेजारी सीपीआर समोर ज्या बागेत आहे, तीच बाग!
पण, त्या काळातलं कोल्हापुरातलं वातावरण फारच स्फोटक बनलं होतं. सावरकरांच्या अभिनव भारत आणि चापेकर बंधूंच्या चापेकर क्लबच्या धरतीवर कोल्हापुरातल्या क्रांतिकारकांनी स्थापन केला होता शिवाजी क्लब. त्यावेळचा पॉलिटिकल एजंट कर्नल फेरीस हा छत्रपती शिवरायांबद्दल नेहमी अवमानकारक बोलायचा. त्यामुळे त्याच्या हत्येचा प्रयत्न शिवाजी क्लबच्या कार्यकर्त्यांनी केला होता. शिवाय प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रयोगशाळेतून रसायने चोरून त्यापासून केलेला बॉम्ब कोल्हापुरात आधीच गाजत होता. या सशस्त्र क्रांतिकारकांशिवाय दुसरा गट होता तो राजाश्रय मिळालेल्या सत्यशोधक चळवळीचा. एकूण सामाजिक वातावरण अशांतच होते. आणि १९१४ मध्ये यातूनच एके दिवशी अल्बर्ट एडवर्डच्या पुतळ्याला डांबर फासण्यात आले. तत्काळ हे पुतळे तिथून हलवले गेले. प्रत्यक्षात फक्त एडवर्डचा पुतळा विद्रूप केला असं सांगितलं गेलं, पण लंडनमध्ये आलेल्या बातमीनुसार बाकीच्या पुतळ्यांचीही हानी करण्यात आली होती. या कृत्याचा वहिम शिवाजी क्लबचे मेंबर आणि सत्यशोधक कार्यकर्ते या दोघांवरही होता; पण प्रत्यक्षात कुणावरही आरोप सिद्ध झाला नाही आणि कुणीच हाती लागले नाही. शेवटी याचं खापर तिथल्या रखवालदाराच्या झोपळूपणावर टाकून मामला रफादफा करण्यात आला. नंतर काही काळाने मेघडंबरी आणि विक्टोरियाचा पुतळा पुन्हा बसवला गेला. तो पुढं बराच काळ तिथं होता..या पुतळ्यांचे मूळ जागी असताना काढलेले काही दुर्मिळ फोटो आज उपलब्ध आहेत. त्यात हे सर्व पुतळे प्रिन्सेस गार्डनमध्ये पहारेकरांच्या निगराणीत दिसतात. काही फोटोत व्हिक्टोरियाचा एकटाच पुतळा दिसतो आणि उरलेले पुतळे एका जाळीच्या कपाटात बंद करून तिथेच ठेवलेले दिसतात. म्हणजे नासधूस प्रकरणानंतरही हे पुतळे तिथंच ठेवले होते हे सिद्ध होतंय.
स्वातंत्र्यानंतर जो सामाजिक बदल झाला. त्यात कलेचा उत्तम नमुना असलेले हे पुतळे कालबाह्य ठरणार हे तर निश्चितच होते. त्यामुळे या सर्वांची रवानगी टाऊन हॉलमध्ये करण्यात आली. आजही शाहू महाराजांच्या मैत्रीची, कोल्हापूरच्या अनाम क्रांतिकारकांची साक्ष देत हे पुतळे तिथं उभे आहेत. अजून एक... या पुतळ्यांच्या इतकेच देखणे होते त्यांचे चबुतरे आणि व्हिक्टोरियाची मेघडंबरी. या मेघडंबरीवर आधारित लक्ष्मीपुरीतल्या आईसाहेब महाराज पुतळ्याची मेघडंबरी आहे. आणि मूळ मेघडंबरी आणि चबुतरा ताराराणी विद्यापीठात आहे; पण उरलेल्या काही पुतळ्यांचे चबुतरे मात्र टाऊन हॉलच्या बाहेर उघड्यावर विपन्नावस्थेत पडलेले दिसतात.
काळ बदलला की राष्ट्रभक्तीची प्रतीकंही बदलतात. त्यामुळे ब्रिटिश दास्याची प्रतीकं म्हणून आजच्या जगात तसं या पुतळ्यांचे महत्त्वही काही उरलेलं नाही; पण कोल्हापूरच्या बदलाचे हे साक्षीदार एकदा टाऊन हॉलमध्ये नजरेखालून घालायला काहीच हरकत नसावी.
-- भारत पांडुरंग महारुगडे
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58155 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..