
जिल्हा परिषदेच गट रचनेत राजकीय हस्तक्षेप
जिल्हा परिषदेतून...
गट, गण रचनेत राजकीय हस्तक्षेप
आमदार प्रकाश आवाडे यांची तक्रार; आमदार, खासदारांवर दबावाचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट व गण यांचे प्रभाग प्रारूप करण्याच्या कामात स्थानिक आमदार व खासदार यांचेकडून हस्तक्षेप झाल्याची तक्रार आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, चौकशीची मागणी केली आहे. यात जर बदल झाला नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे गट व गण यांचे प्रभाग प्रारूप करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील प्रभाग प्रारूप करत असताना, या कामात खासदार व आमदार यांच्याकडून तहसीलदारांवर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप केला.
या अधिकाऱ्यांवर संबंधित लोकप्रतिनिधी यांच्याकडून मंत्रालयातील वरिष्ठ मंत्र्यांकडून प्रभाग प्रारूप कामात चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप केला जात असल्याचे म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर २०२१ रोजी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार उत्तर दिशेकडून सुरुवात करून ईशान्य उत्तर पूर्वकडून, पूर्व पश्चिम करीत दक्षिणेत शेवट करावा, अशा सूचना आहेत. मात्र, संबंधित राजकीय नेतेमंडळींचा हस्तक्षेप सुरू आहे. तहसीलदारांना बोलावून गटांचे प्रभाग प्रारूप त्यांना अपेक्षित असलेल्या पद्धतीनेच करा, असा दबाव टाकला असल्याचा आरोप केला आहे. प्रभाग रचना करताना नियमांचे कसे उल्लंघन झाले. त्याची माहितीही पुराव्यानिशी सादर केल्याचे पत्रात म्हटले आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही तक्रार दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58176 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..