
कस्तुरी सावेकर
21814
-
लेकीच्या जिद्दीला बापाची खमकी साथ
जगातील सर्वोच्च हिमशिखरावर कस्तुरीने रोवला कोल्हापूरचा झेंडा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः करवीरकन्या कस्तुरी सावेकरनं आज सकाळी सहाला माउंट एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा फडकवला आणि मंगळवार पेठेतील सावेकरांच्या घरात आनंदाचे भरते आले. आपल्या पोरीनं जिद्दीनं जगातील सर्वोच्च हिमशिखरावर कोल्हापूरचा झेंडा रोवल्याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. अनेक अडचणींवर मात करत गेल्या चार ते पाच वर्षांच्या कठोर परिश्रमाला यश मिळाल्याच्या समाधानाची झालरही त्याला लाभली.
तळपती तलवार चालवणारी, तितक्याच चपळाईनं लाठी-काठी खेळणारी, बघता बघता एकेक डोंगर- शिखर सर करणारी, सायकलबरोबरच घोडेस्वारी आणि जलतरणात प्रावीण्य मिळवलेल्या कस्तुरीच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर वडील दीपक सावेकर तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कस्तुरी तीन वर्षाची असताना ती वडिलांबरोबर पदभ्रंमतीसाठी गेली. त्यानंतर आजवर कैक किलोमीटरची भटकंती तिने केली. अनेक डोंगर, शिखरं पादाक्रांत केली. ‘मला जगातील सर्वोच्च हिमशिखरावर कोल्हापूरचा झेंडा रोवायचाय’ अशी तिनं इच्छा व्यक्त केली आणि बापानेही मग तिला पाठिंबा दर्शवला. पण, मोहिमेचा खर्च पंचेचाळीस लाखांहून अधिक. तरीही चारचाकी वाहनं दुरुस्त करणारा हा बाप घाबरला नाही. तिच्या या स्वप्नासाठी पायाला भिंगरी बांधून तो सर्वत्र धावला. पै-पै जमवू लागला आणि मोहिमेची तयारी सुरू झाली. अगदी शाळाशाळांत जाऊन एकेक रुपयांची मदत त्यांनी संकलित केली. कस्तुरी मोहिमेला जाणार इतक्यात लॉकडाउन जाहीर झाले आणि मोहीम पुन्हा पुढे गेली. तरीही तिने जिद्दीने सराव सुरूच ठेवला. गेल्या वर्षी ती एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना झाली. मात्र, खराब हवामानामुळे अगदी थोडक्या अंतरावरून तिला परत यावे लागले. मात्र, तरीही न खचता पुन्हा एव्हरेस्ट सर करण्यासाठी ती सज्ज झाली. एकीकडे निधी संकलन सुरू असताना पहाटे साडेचारपासून तिने कसून रोज सात तास सराव केला. त्याशिवाय ध्यान व योगासनाबरोबरच आहाराचे नियोजनही तंतोतंत पाळले आणि आज तिने एव्हरेस्ट सर करून सर्वांचेच स्वप्न पूर्ण केले.
चौकट
‘सकाळ’चे खमके पाठबळ
कस्तुरीच्या या मोहिमेसाठी ‘सकाळ’ने पहिल्यापासून तिला खमके पाठबळ दिले. त्यातून निधी संकलनासाठी मोठी मदत झाली. समाजातील दातृत्वाने तिला विविध माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58227 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..