
कस्तुरी
२१८१२
माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवताच कस्तुरीने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला.
२१८१७
कोल्हापूर ः कस्तुरी सावेकर हिने माऊंट एव्हरेस्ट शनिवारी सर केल्यानंतर कुटुंबीयांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
कोल्हापूरच्या कस्तुरीकडून एव्हरेस्ट सर
करवीरकन्येची मोहीम फत्ते, राजर्षी शाहूंच्या स्मृतींना समर्पित केले यश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखरावर आज करवीरकन्या कस्तुरी सावेकर हिने भारताचा तिरंगा फडकवला. तिने आज सकाळी सहाच्या सुमारास ही मोहीम फत्ते केली. तिने आपले यश लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीला समर्पित केले आहे. एव्हरेस्ट सर करणारी कस्तुरी दक्षिण महाराष्ट्रातील पहिलीच मुलगी ठरल्याची माहिती शनिवारी करवीर हायकर्सचे सिद्धार्थ पंडित, कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कस्तुरी दोन दिवसांत बेसकॅम्पला येईल आणि त्यानंतर मेअखेरीस तिचे कोल्हापुरात आगमन होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कस्तुरीची आई मनस्विनी सावेकर, पंडितराव पोवार आदी उपस्थित होते.
गेल्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या कस्तुरीला खराब हवामानामुळे अगदी काही अंतरावरून खाली यावे लागले होते. मात्र, त्यामुळे न खचता तिने पुन्हा तयारी केली आणि २४ मार्चला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ती रवाना झाली. मोहिमेतील सरावाचा भाग म्हणून कस्तुरीने जगातील चौदा अष्टहजारी शिखरांपैकी सर्वांत अवघड व खडतर असणाऱ्या दहाव्या क्रमांकाचे शिखर माऊंट अन्नपूर्णा एक (उंची २६ हजार ५४५ फूट) निवडले आणि ते यशस्वीरीत्या सर केले. वीस वर्षे सात महिन्यांची असणारी कस्तुरी हे शिखर सर करणारी जगातील सर्वांत तरुण गिर्यारोहक ठरली.
एव्हरेस्ट मोहिमेसाठी तिला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, फिटनेस कोच जितेंद्र गवारे, विजय मोरे आदींचे मार्गदर्शन लाभले. नेपाळमधील ८ के एक्स्पेडिशन या एजन्सीचे तांत्रिक सहाय्य लाभले.
दरम्यान, मोहिमेसाठी सुमारे ४९ लाख रुपये खर्च येतो. आजअखेर विविध संस्था, संघटनांनी साडेअठ्ठावीस लाख रुपयांची मदत दिली असून उर्वरित रक्कम कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी कर्ज काढून उभी केली आहे. त्यासाठी प्रसंगी स्वतःचे गॅरेज व वडिलोपार्जित घर विकून हे कर्ज फेडण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे अजूनही कस्तुरीच्या या मोहिमेसाठी ज्यांना मदत करायची असेल त्यांनी दीपक सावेकर (९८२२६८१००५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करवीर हायकर्सने केले आहे.
अशी केली मोहीम फत्ते
ता. ४ मे - कस्तुरी एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचली
ता. ९ - रात्री नऊ वाजता तिने एव्हरेस्टवर चढाई सुरू केली.
ता. १० - दुपारी कॅम्प दोनवर पोहोचली. तेथे दोन दिवस मुक्काम.
ता. १२ - ती कॅम्प तीनला पोहोचली.
ता. १३ - कॅम्प चारवर पोहोचली. थोड्या विश्रांतीनंतर सायंकाळी सातला अंतिम चढाईला प्रारंभ
ता. १४ - सकाळी सहा वाजता एव्हरेस्ट शिखर सर
राजर्षी शाहूंना वंदन
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता पर्वांतर्गत विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तमाम कोल्हापूरकरांनी सहा मे रोजी शंभर सेकंद स्तब्ध राहून राजर्षींना अनोखी मानवंदना दिली. कस्तुरी सहा मे रोजी एव्हरेस्टच्या बेसकॅम्पवर होती. तेथे तिने दहा सेकंद स्तब्धता पाळून राजर्षींना मानवंदना दिली आणि पुढील मोहिमेला प्रारंभ केला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58308 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..