
जैन सभेचे अधिवेशन
21963
अल्पसंख्याकांच्या हितात
महाराष्ट्र मागे राहणार नाही
अजित पवार ः दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन थाटात संपन्न
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. १५ ः शेजारील कर्नाटकातील अल्पसंख्याक धोरणावर खूप चर्चा झाली, ठीक आहे. मात्र, भविष्यात जैन समाज आणि अल्पसंख्याक समाजाच्या हितात महाराष्ट्र मागे राहणार नाही. पुढील महिनाभरात दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून स्वतंत्र बैठक घेतली जाईल. आगामी पावसाळी अधिवेशनात समाजाच्या मागण्यांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.
दक्षिण भारत जैन सभेच्या ऐतिहासिक शताब्दी अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सुमन पाटील, प्रकाश आवाडे, अरुण लाड, गीता जैन, वीरकुमार पाटील, अभय पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राजू शेट्टी, प्रकाश हुक्केरी, राजीव आवळे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ॲड. धनंजय गुंडे आदी व्यासपीठावर होते. स्वागताध्यक्ष, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्वागत केले. श्रीमतीबाई कळंत्रे श्राविकाश्रम आणि शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगच्या नूतन वास्तूंचे उद्घाटन करण्यात आले.
अजित पवार म्हणाले, ‘दक्षिण भारत जैन सभेचे ऐतिहासिक अधिवेशन द्वेष न करता सर्वांना सोबत नेण्याचा संदेश देणारे आहे. जाती-धर्मांत तेढ निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधू इच्छिणाऱ्यांना हे उत्तर आहे. कुठलीच जात दुसऱ्याचा अनादर करण्याचा संदेश देत नाही. आदर, सन्मान ही आपली संस्कृती व परंपरा आहे. अशावेळी कुणीतरी धार्मिक, भावनिक मुद्दा काढून तेढ निर्माण करत असेल तर ते देशाला परवडणारे नाही. श्रीलंकेत राज्यकर्ते पळून गेले, त्यांची घरे जाळली. पाकिस्तानात पंतप्रधान बदलण्याची वेळ आली. रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उडाला आहे. यातून आपण शहाणपण घेण्याची गरज आहे.’
ते म्हणाले, ‘जैन समाजातील बहुतांश घटक अत्यल्पभूधारक आहे. त्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकार शक्य ते सगळे जरूर करेल. शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण नाव घेतो. तेथे सामान्यांच्या हिताचे धोरण राबवण्यात मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही शेतकरी कर्जमाफीची योजना आणली. वेळेत कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार अनुदान जाहीर केले. काही कारणाने ते मागे राहिले, पण लवकरच ती यादी मागवू आणि पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करू. जैन बांधव मानवता, उद्यमशीलता आणि परोपकाराचे उदाहरण आहेत.’
जयंत पाटील, विश्वजित कदम यांचीही मनोगते झाली. सतेज पाटील यांनी दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या नावाने एक महामंडळ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या. आमदार अभय पाटील यांनी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही समाजहिताचे धोरण राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा शुभेच्छा संदेश मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील यांनी वाचून दाखवला. केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष माधव डोर्ले, सहखजिनदार पा. पा. पाटील, अधिवेशन कार्याध्यक्ष सुरेश पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे, खजिनदार सागर वडगावे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सोनाली बेदरे हिने णमोकार गायन केले. खजिनदार संजय शेटे यांनी आभार मानले.
०००००००००००
महावीर अध्यासन केंद्रास तीन कोटी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवाजी विद्यापीठातील महावीर अध्यासन केंद्रास तीन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. शांतीसागर महाराजांचा विचार राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा म्हणून आजच प्रकाशित झालेल्या ‘धर्मसाम्राज्यनायक’ या पुस्तकाच्या १२ हजार ६०० प्रती खरेदी करून सर्व ग्रंथालयांना पाठवल्या जातील, असे त्यांनी जाहीर केले.
टांगा पलटी निर्णय घ्या
स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अजित पवार यांच्याकडे, समाजाला पैसे, राजकारणात हिस्सा नको; तर समाज हिताचे धोरण हवे आहे, अशी मागणी केली. झटक्यात, टांगा पलटी निर्णय घेऊन समाजहित साधा, असे आवाहन केले.
००००
शासकीय महावीर जयंती व्हावी
सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले, ‘कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात अल्पसंख्याकांना सवलती मिळायला हव्यात. कुणबी शेतकरी घटकांना ओबीसींचे हक्क मिळायला हवेत. पाईपलाईनसाठी गंगा कल्याणसारखी योजना राबवावी. विदेशी शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ द्यावे. महावीर जयंती सोहळा शासकीय करावा. जैन समाज भरभराटीला आला तर देशाची भरभराट होईल. त्यासाठी उद्योग, शिक्षणासाठी समाजाला हात द्या, अशी मागणी केली. कार्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी राज्यात अल्पसंख्यांक समाज हिताच्या धोरणांसाठी पाच हजार कोटी रुपये देण्याची मागणी केली.
००००
शेट्टींना गोंजारले
पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज पुन्हा एकदा माजी खासदार राजू शेट्टी यांना गोंजारले. त्यांचा आजही आमच्या सरकारला पाठिंबा आहे, असा माझा समज आहे, असे जयंतराव म्हणाले. महापुरापासून आमची सुटका करा, असे आवाहन शेट्टींनी केले होते. इस्लामपुरात राजू शेट्टी निवडणूक लढतात तेव्हा त्यांना जास्त मते मिळतात आणि मी लढतो तेव्हा मला... आम्ही दोघे चांगले काम करतो, असे सांगून जयंतरावांनी साखरपेरणी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58536 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..