पाण्याची मुबलकता, तरी कोरड जमिनीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याची मुबलकता, तरी कोरड जमिनीला
पाण्याची मुबलकता, तरी कोरड जमिनीला

पाण्याची मुबलकता, तरी कोरड जमिनीला

sakal_logo
By

पाण्याची मुबलकता, तरी कोरड जमिनीला
ऊस पिकाला वेळेत पाणी मिळेना; उष्म्यामुळे मागणीत वाढ, विजेचा प्रश्‍न
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे ऊस पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली; पण पुरेसा पाणीसाठा असूनही आता उसाला वेळेत पाणी मिळेनाले झाले आहे. वाढलेला उष्मा आणि एक-दोन दिवस पडून जाणारा अवकाळी पाऊस यामुळे जमीन तापत आहे. त्यामुळे पाण्याच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. त्यात मागणीच्या प्रमाणात विजेचा पुरवठा होत नसल्याने या प्रश्‍नाची तीव्रता वाढली आहे. पाण्याची मुबलकता तरी कोरड जमिनीला, अशीच ही परिस्थिती म्हणावी लागेल.
चित्री मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे हिरण्यकेशी बारमाही वाहू लागली. शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले. साहजिकच शेतकऱ्यांचा अधिक पाण्याची नगदी पिके घेण्याकडे कल वाढला. यात प्रामुख्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली. सध्या दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ऊस पीक घेतले जाते. पाण्यासाठी कुणी स्वत:च्या शेतीसाठी, तर कुणी व्यावसायिक पद्धतीने पाणी योजना राबविल्या आहेत. त्यांच्याकडून इतरांना उत्पन्नाच्या चौथाई-पाचवाई हिश्‍श्‍याने पाणीपुरवठा केला जातो. उसाच्या क्षेत्रात वाढ होण्यासाठी ही बाबही सहाय्यभूत ठरली आहे;
मात्र यंदा वातावरणातील उष्मा कमालीचा वाढला आहे. त्यात दर पंधरवडा-वीस दिवसाला अवकाळी पाऊस हजेरी लावून जात आहे. त्यामुळे पुन्हा उष्म्यात वाढ होत आहे. याचा परिणाम जमिनीवर आणि पर्यायाने पिकांवर होत आहे. त्यांच्याकडून पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय पाऊस पडल्यानंतर जमीन फुलल्यामुळे अधिक पाणी लागत आहे. यात विजेच्या प्रश्‍नाची भर पडली आहे. भारनियमन थांबले असले तरी आठच तास वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून एकाच वेळी वीज पंप सुरू केले जातात. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मरवरील लोड वाढून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे फेर फिरण्यास विलंब होत आहे. परिणामी, पुढील शेतकऱ्याला पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
-------------------
चौकट
पाणी पुरवठादार अडचणीत
शेतीसाठी अनेकांनी व्यावसायिक पद्धतीने पाणी योजना राबविल्या आहेत; मात्र उष्म्यामुळे वाढलेली पाण्याची मागणी व विजेच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांना वेळेत पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. यंदा लागवड केलेल्या उसाच्या भरणीचा हंगाम सुरू आहे. उसाच्या भरणीनंतर लगेच पाणी देणे आवश्यक असते; पण वेळेत पाणी देणे अशक्य ठरत असल्याने पाणी पुरवठादारांसमोर अडचणी वाढत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58588 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top