पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

खंडणी मागितल्याप्रकरणी
इचलकरंजीत दोघांना अटक
इचलकरंजी : चारचाकीची तोडफोड करत १५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अमोल सुरेश कामते (वय २३) शुभम महादेव जाधव (२६ दोघे रा. आसरानगर) यांना शहापूर पोलिसांनी अटक केली. आज त्यांना जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आणखी चौघे संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. याबाबतची फिर्याद रोहित पाटील (शहापूर) यांनी दिली. कामते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. संशयितांनी पाटील व त्यांच्या कामगाराला मारहाण करून गळ्यातील सुमारे दोन तोळे सोन्याची चेन हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर घडली.

कोडोलीत १९ जणांवर गुन्हा
कोडोली : मिरवणुकीत विनापरवाना डॉल्बी लावल्या प्रकरणी डॉल्बी मालकासह १९ जणांवर गुन्हा नोंद केला असून ट्रॅक्टर, ट्रॉली व डॉल्बी सिस्टीम ताब्यात घेतली आहे. फौजदार कृष्णात पाटील यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (ता. १५) डॉल्बी लावून मिरवणूक काढली असता किबीले गल्लीजवळ दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली होती. मिरवणुकीत विनापरवाना डॉल्बी लावल्यामुळे सुमित पाटील, जुबेर नदाफ, रोहीत दिलीप वाडकर, सागर चव्हाण, दिग्वीजय शिनगारे, अजित सातपुते, अबीज मुल्ला, प्रदिप काशीद, विक्रम काशीद, निहाल मुजावर, प्रसाद हर्षे, पृथ्वीराज चव्हाण, साहील पटेल, प्रथमेश हर्षे, सुभम शिनगारे, विनायक महाडिक, स्वप्नील पाटील, काईज जमादार व डॉल्बी मालक प्रशांत बुगले यांच्यावर गुन्हा नोंद केला.

पोहाळेत चुलत भावांत मारामारी
कोडोली : पोहाळे (ता. पन्हाळा) येथे चुलत भावांत न्यायप्रविष्ट जागेवर शेडवरील पत्रे घालण्याच्या कारणावरुन काठीने झालेल्या मारामारीत महिला जखमी झाली. सुनिता मोहन साळोखे असे त्यांचे नाव आहे. जखमी सुनिता व वैभव विश्वास साळोखे यांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्याने दोन महिलांसह सहा जणांवर कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोहाळे येथील साळोखे चुलत भावांतील जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. तेथील जागेवर असलेल्या जनावरांच्या शेडवरील पत्रे बदलताना वाद होऊन काठीने मारहाण झाल्याने सुनीता साळोखे यांच्या फिर्यादीवरून वैभव विश्वास साळोखे, विश्वास मारुती साळोखे, उदय विश्वास साळोखे यांच्यावर गुन्हा नोंद केला. वैभव विश्वास साळोखे यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश मोहन साळोखे, मोहन पंडित साळोखे व सुनीता मोहन साळोखे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

दुचाकी घसरून बालकाचा मृत्यू
शाहूवाडी ः अमेणी (ता. शाहूवाडी) येथील घाटातील वळणावर दुचाकी घसरून आर्यन महेश उरूणकर (वय ५, रा. इस्लामपूर जि.सांगली) या बालकाचा मृत्यू झाला. सकाळी दहाच्या दरम्यान अपघात घडला. येळवण जुगाई येथे देवदर्शनासाठी अरूणकर कुटुंब निघाले असता अपघात झाला. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, महेश उरुणकर कुटुंबासोबत येळवण जुगाई येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी मोटारसायकल (एमएच १० डीबी ८१५१) अमेणी घाटातील वळणावर घसरली. त्यावेळी मागे बसलेला आर्यन रस्त्यावर आदळला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अधिक तपास शाहूवाडी पोलिस करत आहेत.

काखेत भाऊबंधात मारामारी
कोडोली : काखे (ता. पन्हाळा) येथे सामाईक विहिरीतील पाणी पाजण्यावरून भावकीतील दोन गटात वाद होऊन एकमेकांना काठीने मारहाण केल्याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केल्याने चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी, सामाईक विहिरीतील पाणी पाजण्यावरुन दोन्ही गटाकडून एकमेकांनी काठीने मारहाण केली. अशोक सातवेकर यांच्या फिर्यादीरून सचिन सातवेकर व विजय सातवेकर या दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सचिन सातवेकर यांच्या फिर्यादीवरून अशोक सातवेकर व कृष्णात सातवेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शुक्रवार पेठेतील घराला आग
कोल्हापूर ः शुक्रवार पेठेतील घराला रात्री शॉर्ट सर्किटने आग लागली. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने दिलेली माहिती, शुक्रवार पेठेत कोडोलीकर कुटुंब राहते. त्यांचे जुने घर आहे. ते कामानिमित्त सायंकाळी बाहेर गेले होते. दरम्यान त्यांच्या घरातून धुराचे लोट येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. घटनास्थळी अग्निशामक दलाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. पण त्यापूर्वी आगीत सुमारे दोन लाखांचे घरासह प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याचे जवानांकडून सांगण्यात आले.

तारदाळात बांधकाम कामगार जखमी
जयसिंगपूर : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील आवाडे पार्कमध्ये सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून शहानवाज हमीमपीर मकानदार (वय ४०, चिपरी, ता. शिरोळ) येथे जखमी झाल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. जखमीला सांगली येथील खासगी रूग्णालयात दाखल केली आहे. याबाबतची नोंद सांगली विश्रामबाग पोलिसात झाली आहे.

जयसिंगपुरात लॉपटॉप चोरीस
जयसिंगपूर ः शहरातील नांदणी रोड शाहूनगरमधील सुरज राजेंद्र पाटील यांच्या घरातून तीस हजारांचा लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पाटील यांनी खिडकीचे दार अर्धवट ठेवले होते. यातून चोरट्यांनी हात घालून लॅपटॉप चोरून नेला आहे. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे.

उगावात सायलेन्सरची चोरी
जयसिंगपूर : उदगांव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये मनोज धनपाल देसाई यांची चार चाकी वाहनाचे पन्नास हजारांचे सायलन्सर चोरी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे.

अपघातात महिला जखमी
कोल्‍हापूर : कोकरुड घाटात (ता. शिराळा) मोटारसायकल घसरुन आज सकाळी झालेल्या अपघातात महिला जखमी झाली. महादेवी उरुणकर असे जखमी महिलेचे नाव आहे. त्‍यांना उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल करण्‍यात आले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

मारहाणीत दोन परप्रांतिय जखमी
कोल्‍हापूर : पन्‍हाळा येथे अज्ञातांनी आज दुपारी केलेल्‍या मारहाणीत दोन परप्रांतिय तरुण जखमी झाले. हबीबअहमद हबीबमहंमद अरफीज (वय १९), जाहीद मोईन जैद (२०, दोघे रा. हैद्राबाद) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना सीपीआरमध्‍ये दाखल केले. याबाबतची नोंद सीपीआर चौकीत झाली.

बदवणवाडीत एकाला मारहाण
उत्तूर ः डोक्यात दगड मारल्याने सतीश आनंदा तेरुडकर (भादवणवाडी) जखमी झाले. याबाबत मारुती आण्णापा पाटील व सागर मारुती पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुलीस पळवून नेल्याचे कारणावरून तेरुडकर व पाटील यांच्यात वाद झाला. या वेळी मारुती याने सतीशच्या डोक्यात दगड मारला. यात सतीश जखमी झाला. तपास सहाय्यक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59173 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top