रिपोर्ताज‘ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपोर्ताज‘
रिपोर्ताज‘

रिपोर्ताज‘

sakal_logo
By

22579
22581

मनपा फोटो

रिपोर्ताज
उदयसिंग पाटील

नागरिकांचे हेलपाट्यांवर हेलपाटे

मनपाच्या विभागीय कार्यालयात कामांसाठी टोलवाटोलवी; फिरती, बैठकीच्या नावावर अधिकारी गैरहजर

लीड
शहरवासीयांना दररोज भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक तत्काळ करण्यासाठी कामाचे विकेंद्रीकरण करत महापालिकेने विभागीय कार्यालये तयार केली. तिथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची थेट भेट व्हावी ही अपेक्षा. पण चारही विभागीय कार्यालयांना भेटी दिल्यानंतर त्यातील पवडी या प्रमुख विभागातील कोण अधिकारी बैठकीला, कोण फिरतीला तर कोण रजेवर. त्यामुळे हाताखालील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती नाममात्रच. त्यांची उपस्थिती एक सोपस्काराप्रमाणेच. केवळ वेळ ढकलण्याचीच त्यांची ड्यूटी असल्याचे जाणवत होते. या साऱ्यामुळे एक काम करून घ्यायचे असेल तर सतराशे साठ हेलपाट्यांशिवाय ते होतच नसल्याची स्थिती. अधिकारी-कर्मचारी जर कायम फिरती करत असतील तर भागातील रस्त्यावरील अतिक्रमण, रस्त्यांची दुरवस्था, गटारींच्या दयनीय स्थितीबाबत नागरिक तक्रारी का करतात, हे एक न सुटणारे कोडेच आहे.


अतिक्रमण करून घर
बांधल्यानंतरच बहुधा पाहणी
सकाळी दहा वाजता कार्यालयातील कामकाज सुरू होण्याची वेळ. दौलतराव भोसले विद्यालयातील विभागीय कार्यालय क्रमांक एकमध्ये (गांधी मैदान) दोन महिला कर्मचाऱ्यांकडून झाडलोटच सुरू होती. सुरूवातीलाच बसलेल्या शिपायाकडे उपशहर अभियंत्यांची विचारणा केल्यावर त्याने तडक आज साहेब येणार नाहीत, बैठकीला गेले आहेत असे सांगून टाकले. काही अभियंते फिरतीवर असल्याने बहुतांश खुर्च्या रिकाम्याच होत्या. एक लिपिक तब्बल वीस मिनिटांनंतर कार्यालयात आरामात आले. एक कनिष्ठ अभियंता व एक सर्व्हेअर मात्र आपापल्या खुर्चीवर होते. त्याचवेळी दिलीप चिकडोळ हे नातेवाईकांसह सर्व्हेअरकडे अर्ज घेऊन आले होते. त्यांच्या जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबतची तक्रार होती. त्यांनी काल अर्ज दिला होता, पण आज येण्यास सांगितले होते. ते आज इतर कागदपत्रे घेऊन आल्यानंतर असेसमेंट उतारा घेऊन येण्यास सांगितले. कालच सांगितले असते तर तो घेऊनच आलो असतो ही त्यांची या कामकाजावरील प्रतिक्रिया. अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज घेण्यासाठी दोन दिवस लावत असतील तर अतिक्रमण करून घर बांधल्यानंतरच त्यांच्याकडून पाहणी होणार का? हा त्यांनी उपस्थित केलेला सवाल सारीच परिस्थिती सांगून जात होता.


कर्मचारी कार्यालयात,
पण समस्या रस्त्यावरच
ही स्थिती पाहून शिवाजी मार्केटमध्ये असणाऱ्या विभागीय कार्यालय क्रमांक दोनकडे मोर्चा वळवला. पूर्ण गावठाण भाग असलेल्या या कार्यालयाकडे दाटीवाटीतील इमारतींची संख्या जास्त. गटारी, ड्रेनेजच्या वारंवार तक्रारी असणारा हा परिसर. अकराच्या सुमारास या कार्यालयात सहायक अभियंत्यांसह इतर कर्मचारी जागेवर होते. उपशहर अभियंता बैठकीला गेले होते. कार्यालयीन कामकाज सुरू असल्याचे दिसत असले तरी एकही नागरिक कार्यालयात नव्हता. नागरिकांची कोणतीही तक्रार नसणे किंवा तक्रार करूनही काही फरक पडत नसल्याने पाठ फिरवणे अशी दोन कारणे यापाठीमागे असू शकतात. या कार्यालयाकडे येत असताना त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या प्रभागातील रस्त्यावरील परिस्थिती पाहिली की अनेक वाहने रस्त्यावर पार्किंग केल्याचे दिसत होते. मटण मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे मोठे होत आहेत. अंतर्गत काही रस्त्यांची अवस्था वाईट आहे. प्रभागातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी नेमलेल्या या कार्यालयाला या समस्या दिसलेल्या नसल्याचे उत्तर मिळत होते. घरफाळा विभागात साऱ्या टेबलवर काम सुरू होते.

एक मुंबईला, एक रजेवर
गर्दीतील परिसर सोडून नियोजनबद्ध वसलेल्या राजारामपुरीतील विभागीय कार्यालय क्रमांक तीनच्या मार्गाला लागलो. जाताना राजारामपुरीत झालेली अतिक्रमण निर्मूलनची कारवाई दिसत होती. या धगधगत्या विषयामुळे कार्यालयातील सारेजण अलर्ट असतील अशी अपेक्षा होती. पण सकाळी साडेअकराच्या वेळेत कार्यालयात गेल्यानंतर कार्यालय सुरू आहे की सुटी झाली असेच वातावरण होते. मोठ्या हॉलमध्ये छोटी-छोटी कंपार्टमेंट असलेल्या कार्यालयात मोजून पाच कर्मचारी होते. तेही कंपार्टमेंटमुळे दिसत नव्हते. त्यातीलही काही समोर कॉम्प्युटर सुरू व डोके मोबाईलमध्ये घातलेले असेच होते. एखादा नागरिक कार्यालयात कामानिमित्त आला तर कुणीही नाही असेच समजून गेला असता. तेथील एका कर्मचाऱ्याला विचारल्यानंतर कनिष्ठ अभियंत्यांपैकी एक मुंबईला गेले आहेत तर एक रजेवर असल्याचे सांगितले. उपशहर अभियंता बैठकीसाठी गेले होते. सकाळी अकराच्या सुमारास ही स्थिती होती. केव्हा येतील याचा नेम नव्हता. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे का होतात याचे ढळढळीत उत्तर ही कार्यालयाची स्थितीच देत होती. प्रधानमंत्री आवास योजनेतील अनेक लाभार्थी परवाना न मिळाल्याने हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी रेखा भंडारे यांनी या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत असल्याचे सांगितले. कार्यालयात कोणी नसल्याने परत यावे लागणार असे म्हणत त्या परत फिरल्या. दोन खोल्यांत असलेल्या घरफाळा विभागात नागरिकांची गर्दी होती.

साहेब गेले भागात
कार्यालयात मुकादम
ई वॉर्डमधील प्रभाग असलेले ताराराणी चौक विभागीय कार्यालय क्रमांक चारकडे जाताना साडेबारा वाजून गेले होते. सकाळी फिरतीला गेलेले परत आले असतील असे वाटत होते. कार्यालयात गेल्यानंतर एक लिपिक व कॉम्प्युटरचा ऑपरेटर सोडल्यास इतर खुर्च्या रिकाम्या होत्या. येथील उपशहर अभियंत्यांकडे पाणीपुरवठा विभागाचाही कार्यभार असल्याने ते पाणीपुरवठ्याच्या फिरतीवर गेले होते. काहीवेळापूर्वीच दोन कनिष्ठ अभियंते पाहणीसाठी बाहेर पडल्याचे व एक रजेवर असल्याचे तेथील लिपिकाने सांगितले. त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर ते मुकादम असून उपस्थित असलेले सुपरवायझर व मुकादम असल्याचे सांगितले. या कार्यालयाच्या पलीकडे घरफाळा विभागाचे कार्यालय होते, तिथे नागरिकांची गर्दी होती. चारही ठिकाणांना भेटी दिल्यानंतर नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी कार्यालये निर्माण झालीत की दुप्पट करण्यासाठी झाली हेच समजत नव्हते. कामाच्या फिरतीवर जायचे, ज्यावेळी नागरिक येणार नाहीत. त्यावेळी कार्यालयात पाय लावायचे. नागरिक येण्याच्या वेळेत बाहेर पडायचे हे समीकरण नागरिकांना समजू लागले आहे. ही परिस्थितीच महापालिकेविषयी नकारात्मक मत नागरिकांत तयार करत आहे. याची जाणीव होणार की नाही हा प्रश्‍न मनात घेऊन बाहेर पडलो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59222 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top