
पूरस्थिती गरोदर महिलांचा प्रश्न - आढावा बैठक
पूरग्रस्त भागात २४ तास कर्मचारी तैनात
-----------
जिल्हाधिकारी रेखावार; गरोदर महिलांच्या खबरदारीसह पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः धरणांच्या पाण्याचा विसर्ग नियमित ठेवण्यापासून पूरस्थितीच्या गावात पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर प्रामुख्याने करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विभागीय आयुक्तांच्या बैठकीत दिली. जिल्ह्यातील सुमारे पाच हजार गरोदर महिलांना प्रसूतीसाठी योग्य त्यावेळी रुग्णालयात हलविण्याची तयारी आरोग्य विभागाने केली आहे. पाण्याखाली जाणाऱ्या रस्ते, पुलाच्या ठिकाणी २४ तास कर्मचारी नियुक्तीचे नियोजन असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त रामोड यांच्याकडून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत मॉन्सून पूर्वतयारी, संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेतला.
मॉन्सून पूर्व तयारीचा आढावा घेताना अतिरिक्त आयुक्त आपत्तकालीन कक्ष २४ तास सुरू ठेवा. गावपातळीवरील आराखडे तयार करा, पूरबाधित गावांतील व्यक्तींचा संपर्क ठेवा. कसूर नको, यासह अन्य सूचना अतिरिक्त आयुक्तांनी केल्या.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘जिल्ह्यातील गावनिहाय आराखडे तयार असून, त्याची अंमलबजावणी योग्य होईल याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक गरोदर महिलांची प्रसूती जुलै-ऑगस्ट या संभाव्य महापुराच्या काळात आहे. त्यांना सुस्थितीत ठेवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. पावसाळ्यात संभाव्य महापुरात ज्या ठिकाणी पूल आणि रस्ते पाण्याखाली जातात अशा ठिकाणी केवळ फलक उभा न करता १५ जुलैपासून ५ ऑगस्टपर्यंत तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नेमले जाणार आहेत. तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीशी संपर्कात राहण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ बैठकीत सहभागी झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59337 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..