हद्दवाढ बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दवाढ बैठक
हद्दवाढ बैठक

हद्दवाढ बैठक

sakal_logo
By

22753

हद्दवाढीला विरोध करणाऱ्या
गावांची केएमटी, पाणी बंद करा

कृती समितीची मागणी; कडक कारवाईची प्रशासकांकडून अपेक्षा

कोल्हापूर, ता. १८ ः कोल्हापूरच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांची केएमटी, पाणीपुरवठा तसेच सवलतीतील आरोग्य सेवा बंद करण्याची मागणी हद्दवाढ कृती समितीने आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना केली. गावांचा विरोध मोडून काढण्यासाठी त्यांच्या सेवा बंद करून नाक दाबण्याची वेळ आल्याचेही सांगितले. डॉ. बलकवडे यांनी हद्दवाढीबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, तो कायम करत राहू, असे सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीनंतर हद्दवाढ होणार आहे. आता पावसाळ्यामुळे निवडणूक पुढे जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने शासनाकडे हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करावा म्हणून समितीच्या शिष्टमंडळाने प्रशासकांची भेट घेतली. त्यावेळी ही मागणी केली. आर. के. पोवार यांनी प्रशासकांकडे मोठे अधिकार आहेत, त्यांच्या प्रयत्नानंतरही हद्दवाढ होत नसेल तर नगरपालिका करण्याचा ठराव करून द्या, आम्ही त्याची मागणी सरकारकडे करतो, असे उद्वेगाने सांगितले. ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, ‘‘हद्दवाढीत येणार नाही असे म्हणणाऱ्या गावांना महापालिकेची काय किंमत आहे हे दाखवून द्यायची वेळ आली आहे. सध्या आर्थिक परिस्थिती नाही म्हणून हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांत जाणाऱ्या केएमटी बंद कराव्यात. त्यामुळे किमान केएमटीचा तोटा कमी होईल. महापालिकेकडून पाणी घेणाऱ्या अनेक गावांची जुनी पाणीपट्टी वसूल झालेली नाही. अनेक गावांचे लोकप्रतिनिधी शहरात राहतात व हद्दवाढीला विरोध करतात. त्यामुळे त्यांच्यावर कडक पाऊल उचलण्याची गरज आहे.’’
अनिल कदम म्हणाले, ‘‘निगडेवाडी नाक्यापर्यंत महापालिकेची हद्द आहे. तेथील व्यावसायिकांकडून महापालिकेने कर वसूल करावेत. त्याबाबत नोटीस पाठवावी.’’ बाबा पार्टे यांनी हद्दवाढीबाबत महापालिका प्रशासनाची तळमळ दिसत नसल्याचे सांगितले. किशोर घाटगे यांनी शेजारील गावातील लोक महापालिकेच्या दवाखान्यांचा तसेच स्मशानभूमीचा वापर करत असल्याचे सांगितले. त्याबाबत ॲड. इंदूलकर यांनी शहरवासीयांना सवलतीच्या दरात सेवा मिळावी व ग्रामीणमधील रुग्णांकडून जादा दर आकारावा, असे सुचवले. अनिल घाटगे यांनीही शहरवासीयांसाठी हद्दवाढ गरजेचे असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी हद्दवाढ करण्याचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे; पण निगडेवाडीजवळील व्यावसायिकांकडून कर वसुलीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते. तसेच सुनील देसाई, अशोक भंडारे, फिरोज सरगूर आदी उपस्थित होते.

चौकट
पोटकामगारांवर कारवाई करा
ॲड. इंदूलकर यांनी सफाई कामगारांनी पोटकामगार नेमले असल्याचे एका मुकादमाने राजारामपुरीत उपायुक्तांसमोर कबूल केल्याचे सांगितले. याप्रकारचे कामगार मोठ्या संख्येने आहेत असेही सांगितले. उपायुक्त आडसूळ यांनी मुकादमाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले. त्यावर डॉ. बलकवडे यांनी त्याने कबूल केले असले तर त्याला निलंबित करायला हवे, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59430 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top