माणुसकी फाउंडेशनचे आंदोलन स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणुसकी फाउंडेशनचे आंदोलन स्थगित
माणुसकी फाउंडेशनचे आंदोलन स्थगित

माणुसकी फाउंडेशनचे आंदोलन स्थगित

sakal_logo
By

माणुसकी फाउंडेशनचे आंदोलन स्थगित
रवि जावळे; आयजीएम वैद्यकीय अधीक्षकांचे कारवाईचे आश्वासन
इचलकरंजी, ता. १९ : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेली निराधार व्यक्ती पुन्हा पोस्ट कार्यालय परिसरात आढळून आल्याने या प्रकरणी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्याची दखल घेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्रकुमार शेट्ये यांनी संबंधितांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाईचे आश्‍वासन डॉ. शेट्ये यांनी दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी दिली.
मागील आठवड्यात शहरातील मुख्य पोस्ट कार्यालय परिसरात एक निराधार व्यक्ती रस्त्याकडेला पडून होती. त्याला धड चालताही येत नव्हते. या संदर्भात काही नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन माणुसकी फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या निराधार व्यक्तीला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अवघ्या दोनच दिवसांत ती व्यक्ती पुन्हा पोस्ट कार्यालयात परिसरात रस्त्यावर दिसून आली. त्यामुळे संतप्त माणुसकी फाउंडेशनने रुग्णालयात जात तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता. त्यावेळी संबंधितांवर कारवाई न झाल्यास मंगळवारपासून आंदोलन छेडण्याचा इशाराही माणुसकी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला होता. याबाबत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. शेट्ये, डॉ. महेश महाडिक यांची भेट घेऊन विचारणा केली असता डॉ. शेट्ये यांनी त्या व्यक्तीवर ज्या वॉर्डमध्ये उपचार सुरू होते, त्या वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा प्राप्त होताच कारवाई करू, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे माणुसकी फाउंडेशनच्यावतीने करण्यात येणारे आंदोलन स्थगित केले. या वेळी प्रथमेश इंदुलकर, आनंद इंगवले, चेतन चव्हाण, ऋषिकेश सातपुते आदींसह रुग्णालय कल्याण समिती सदस्य सुभाष मालपाणी उपस्थित होते.