
पान एक-कर्नाटक ''वन''ला ठोशास ठोसा
२२७५१
मांगेली : कर्नाटक सड्यावर वनहद्दीत खासगी जमिनीतून जाणारा रस्ता गावकऱ्यांनी चर खोदून बंद केला आहे.
कर्नाटक वन विभागाला ठोशास ठोसा
मांगेलीवासीय आक्रमक ः महाराष्ट्र हद्दीतील रस्ता खोदला
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १८ ः कर्नाटक वनविभागाने मांगेली सडा रस्त्याचे डांबरीकरण रोखल्याने कर्नाटक सडा येथील वनहद्दीत जाणारा रस्ता बंद करून मांगेलीवासीयांनी कर्नाटक वनविभागाला ठोशास ठोसा दिला. आपल्या खासगी जमिनीतून जाणाऱ्या रस्त्याचा वापर कर्नाटक वनविभाग करत होते. तोच रस्ता एका ठिकाणीं दगड टाकून व दुसऱ्या ठिकाणीं जेसीबी यंत्राने चर खोदून गावकऱ्यांनी बंद केला.
आमदार दीपक केसरकर यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राचे पिढ्यान्पिढ्यांचे रोटी बेटीचे व्यवहार लक्षात घेऊन जवळच्या मांगेली सडा रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून मोठा निधी मंजूर केला. रस्त्याचे डांबरीकरणाचे कामही व्यवस्थित सुरू होते; पण जिथे महाराष्ट्र हद्दीतील काम संपणार होते, ती हद्द आपली आहे असा दावा करून कर्नाटक वनविभागाने काम बंद पाडले. ठेकेदाराच्या मुकादमालाही उचलून नेले. आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यकर्त्यांनी तेथे जात त्या मुकादमाला परत आणले; पण प्रश्न तिथे संपला नाही. गावकऱ्यांचे म्हणणे आहे, की आपली हद्द अजून खूप पुढे आहे. कर्नाटक वनविभाग चुकीची हद्द दाखवत आहे. त्यांची हद्द जंगलात येते; पण हद्दीचा दगड लावताना जंगलात जाणे टाळून कर्मचाऱ्यांनी आपल्याला सोयीस्कर ठिकाणी रस्त्यालगत दगड लावून आमच्याच जमिनीत अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे कर्नाटक वनविभागाने दावा केलेली जमीन मांगेलीवासीयांच्या वहिवाटीत होती आणि ते त्या जमिनीत शेत पिकवायचे. असे असताना कर्नाटक वनविभाग दादागिरीने आमचे डांबरीकरण रोखत आहे. आमच्या पारंपरिक जमिनीत आपला हक्क सांगत आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी कर्नाटकातील सडा भागात वनक्षेत्राकडे जाणारा रस्ताच जमीन मालकांनी बंद केला आहे.
त्यासाठीच रस्ता रोखला
सड्यावर पुरातन किल्ला, राजवाडा आणि प्राचीन विहीर आहे. ते पर्यटनस्थळ असले तरी पायाभूत सुविधांची वानवा आहे. विशेष म्हणजे तिथे राहणाऱ्या जवळपास वीस-पंचवीस कुटुंबाचे आणि महाराष्ट्रातील लोकांचे अनेक वर्षांपासूनचे रोटी बेटीचे व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा रस्ता बंद करणे गावकऱ्यांना रुचत नाही; पण कर्नाटक वनविभागाला धडा शिकवण्यासाठी, त्यांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी मांगेलीवासीयांनी तो रस्ता बंद केला आहे, असे संबंधितांनी सांगितले.
हक्कासाठी न्यायालयात जाण्याचा विचार
कर्नाटक वनविभागाची माजोरी इतकी की त्यांनी दावा केलेल्या आपल्या जमिनीत ठेकेदाराने टाकलेली खडी सुद्धा उचलून न्यायला लावली. कर्नाटक महाराष्ट्र हद्दीच्या वादात आपली कित्येक एकर जमीन कर्नाटक वन विभाग आपल्या घशात घालू पाहत असल्याने तेथील गावकरी त्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचे समजते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59456 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..