इच्छुक गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इच्छुक गायब
इच्छुक गायब

इच्छुक गायब

sakal_logo
By

लोगो ः सरकारनामा, महापालिका
--

इच्छुक झाले गायब
खर्चाचा भुर्दंड वाचवण्यासाठी निवडला मार्ग; निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत राहणार शांत

कोल्हापूर, ता. १९ ः सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. त्यानुसार प्रभाग रचना अंतिम झाली. आता आरक्षण व मतदार यादीही अंतिम करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यातून महापालिका निवडणूक निश्‍चित झाली तरी इच्छुक अजूनही आपला पत्ता उघड करण्यास धजावलेले नाहीत. दोन वर्षांत निवडणूक केव्हाही लागणार असे समजून अनेक इच्छुकांना सण, यात्रा, विविध समारंभ, महाप्रसाद अशा कारणांनी खिसा रिकामा करायला लावला आहे. त्यामुळे आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होत नाही, तोपर्यंत रिंगणात उतरणार असल्याचे सांगायचे नाही, असे ठरवून ते गायबच झाले आहेत. पावसाळ्यानंतर निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी थोडी उसंत घेतली आहे.
महापालिकेची निवडणूक लागली की, हौसे-नवसे-गवसे आधीपासूनच वातावरण तयार करत असतात. त्यांतील अनेकजण रिंगणाच्या टप्प्यातही येत नाहीत; पण तोपर्यंत ‘मोठी’ तजवीज करून ठेवतात. त्यासाठी कालावधी फारसा नसतो. खर्च करायला फार वेळ लागत नाही. जेवणावळी तसेच एखाद्या प्रभागात मोठा कार्यक्रम झाला की, सारे सेटल करण्यास ते तयार होत असतात. २०२० नंतर तसे अनेकजण तयार झाले. त्यांना पुढील वाट ओळखता आली नसल्याने खर्च करून बसले. त्यानंतर निवडणूक लांबत गेली, तसे त्यांचे बजेट संपत आले. आता असे हौसे कुठे दिसत नसल्याची स्थिती आहे. ‘कुठे गेले उमेदवार’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
आता निवडणूक निश्‍चित झाली असली तरी अजून न्यायालयाचा भाग सुरू आहे. त्यात आणखी वेगळे होण्याची भीती आहे. त्यामुळे इच्छुकांनी सावध पाऊले उचलली आहेत. सध्या निवडणुकीचे वातावरण तयार झाल्यास विरोधकांच्या गोटात मतदार जाण्यापासून वाचवण्यासाठी हात सैल सोडावे लागतात. तोंडावर असलेल्या पावसाळ्यात मोठा खर्च होणारी टेंबलाईची यात्रा, त्यानंतर गणेशोत्सव हे सण आहेत. गल्लीमध्ये या दोन्ही सणांसाठी इच्छुकांना मदत करावीच लागते. जे काठावर राहून फायदा पदरात पाडून घेणारे आहेत, त्यांनी या खर्चात पडायचे नाही, असे ठरवलेले दिसते. त्यामुळे स्पष्टपणे न सांगता अजून रिंगणाबाहेरूनच नियोजन करण्यात मग्न आहेत. ज्यांनी तयारी करून ठेवली आहे, त्यांनी त्रिसदस्यीय प्रभागातील हक्काचा सोडून इतर भागात लक्ष देण्यास सुरूवात केली आहे.

चौकट
मित्र लागले तुटायला
अनेकांची इच्छा निवडणूक लढवायची असते. त्यात कायम सोबत असणाऱ्या मित्राचीही इच्छा असू शकते. आता वातावरण तयार होऊ लागल्याने त्यातील काहीजण उमेदवार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करण्याची संधी शोधत असतात. खास माणसांना सांगत असतात. त्यातून नेहमी सोबत असणारा मित्र तयारी करत आहे, असे समजल्यानंतर दोघांमध्ये दरी पडू लागली आहे. अशा घटना प्रभागांमध्ये घडू लागल्या आहेत.

दृष्टिक्षेपात...
एकूण प्रभाग - ३१
तीन सदस्य असणारे प्रभाग - ३०
दोन सदस्य असणारा प्रभाग - १
एकूण सदस्य संख्या - ९२
खुल्या प्रवर्गातील सदस्य - ७९
अनुसूचित जाती सदस्य - १२
अनुसूचित जमाती सदस्य - १