
कोटीतीर्थ कारवाई
२२९७७
कोटितीर्थप्रश्नी महापालिकेला नोटीस
प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई; फौजदारीची प्रक्रिया सुरू करणार
कोल्हापूर, ता. १९ ः कोटितीर्थ तलावातील प्रदूषणास कारणीभूत ठरल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल तसेच जलपर्णी काढण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी आज दिली.
ई वॉर्ड लोककल्याण संघर्ष समितीचे ॲड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी कोटितीर्थ तलावातील प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मार्चमध्ये कोटितीर्थ तलावातील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्याचा अहवाल आला. त्यामध्ये प्रचंड प्रदूषण असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मासे मरण्याच्या घटना होत असून जलपर्णी वाढली आहे. महापालिकेचे तलावात मिसळणारे सांडपाणी त्यासाठी प्रमुख कारणीभूत आहे. त्यांच्यावर काय कारवाई केली, असा जाब विचारण्यात आला. तसेच महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे हे बैठकीस उपस्थित नसल्याने विचारणा केल्यावर निरोप मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ नोटीस देते व शांत बसते. त्यानंतर काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. कोटितीर्थ तलावातील प्रदूषणाबाबत काय कारवाई केली, जलपर्णी काढण्यासाठी काय करणार आहात, रंकाळा तलावात मिसळत असलेल्या सांडपाण्यामुळे तिथे जलपर्णी वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्याबाबत काय कारवाई करणार, तसेच पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई केली जात आहे, याची विचारणा प्रादेशिक अधिकारी साळुंखे यांच्याकडे करण्यात आली. तसेच कोटितीर्थमधील सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेला उपाययोजना करण्याची सूचना केली. याबाबत साळुंखे म्हणाले, ‘या प्रकरणी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून पुढे गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात येईल. जलपर्णी काढण्याचेही आदेश दिले आहेत.’ यावेळी क्षेत्रीय अधिकारी अर्जुन जाधव उपस्थित होते.