प्रभाग रचना हरकतींचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग रचना हरकतींचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
प्रभाग रचना हरकतींचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

प्रभाग रचना हरकतींचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

sakal_logo
By

प्रभाग रचना हरकतींचा निर्णय
जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
गडहिंग्लजला पाच हरकतींवर सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर दाखल पाच हरकतींची सुनावणी आज नियंत्रण अधिकारी तथा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या समोर झाली. आता या हरकतींवर स्वतंत्र अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या पातळीवरच हरकत मान्य अगर अमान्यचा निर्णय कळणार आहे.
हद्दवाढ झाल्याने त्या भागातील लोकसंख्याही पालिकेच्या प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे जुन्या प्रभागांमध्ये फोडाफोडी झाली आहे. स्वाती कोरी, नितीन देसाई, चिन्मय देशपांडे यांनी प्रभाग पाचमधील काही भाग चारमध्ये, अकरामधून पाचमध्ये काही भागाचा समाविष्ट करण्याची मागणी केली होती. विनोद बिलावर, वामन बिलावर, दिपक कुराडे यांनी मूळ मागासवर्गीय प्रभागाचे विभाजन झाल्याने अनुसूचित जाती गटाचा हक्काचा प्रभाग बदलला असून तो पूर्ववत करण्याची मागणी केली होती. मूळ प्रभाग क्रमांक तीन हाच अनुसूचित जाती गटासाठी राखीव ठेवण्यासाठी मारुती मंदिरमागील काही भाग दोनमध्ये समाविष्ट करण्याचा पर्याय दिला.
परंतु प्रगणक गट फोडता येत नाही. प्रगणक गटांची अदलाबदल होऊन लोकसंख्येचे गणित जुळत असल्यास जिल्हाधिकारी पातळीवर याचा निर्णय होणार आहे. संतोष चिकोडे यांनी प्रभाग आठमधील काही भाग सातमध्ये समाविष्ट करुन प्रभाग पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. या सर्व हरकतींवर सुनावणी घेवून वाघमोडे यांनी स्वत:च्या अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविणार असल्याचे सांगितले. यावेळी प्र. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्यासह हारुण सय्यद, रेश्मा कांबळे, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
------------------
चौकट
लोकसंख्येचे गणित...
२०११ च्या लोकसंख्येवर आधारीत प्रभाग रचना तयार केली आहे. त्याला प्रगणक गटांचा आधार घेतला आहे. प्रभाग तयार करताना प्रगणक गट फोडू नयेत अशा सूचना आहेत. यामुळे लोकसंख्येची अदलाबदल करताना अखंड प्रगणक गटाचेच स्थलांतर करावे लागते. दाखल हरकतींचा विचार करताना प्रगणक गटांची अदलाबदलच करावे लागणार आहे. तसेच अधिकाधिक ३२६९ आणि कमीतकमी २६६३ लोकसंख्येचे प्रभाग तयार केले असून हरकतींचा विचार करताना नियमानुसार या दोन्ही आकड्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही.