
मनपा भाजप बैठक
23032
राजकीय आकसापोटी कारवाई
प्रभाग एकपासून सुरूवात केल्यास पाठिशी राहू; भाजपच्या शिष्टमंडळाची प्रशासकांशी चर्चा
कोल्हापूर, ता. १९ ः शहरातील अन्य अनाधिकृत बांधकामांबाबत पत्र देऊनही ते पाडले जात नाही. मात्र, उद्यानात बैठक घेऊन कोणाच्या तरी राजकीय आकसापोटी राजारामपुरीतील सामान्य नागरिकांच्या घरांवर दुसऱ्याच दिवशी कारवाई केली जाते, ही बाब चुकीची आहे. शहर सुंदर करायचे असेल तर शहराचा आराखडा तयार करा व प्रभाग एकपासून कारवाईला सुरूवात करा, आम्ही पाठिशी राहू, असे भाजपच्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना सांगितले.
राजारामपुरीत झालेल्या अतिक्रमण कारवाईबाबत आज भाजपच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने प्रशासकांसमोर व्यथा मांडल्या. माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी महापौर सुनील कदम, प्रा. जयंत पाटील, भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, ॲड. बाबा इंदुलकर, रहिम सनदी, संग्राम निंबाळकर, विवेक वोरा, विशाल शिराळे उपस्थित होते. कारवाई कोणाच्या आदेशाने झाली याची नगररचना विभागाचे उपशहर रचनाकार रमेश मस्कर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे विचारणा करत धारेवर धरले. मार्केट कमिटीमध्ये १६ गाळे रस्त्यावर बांधले आहेत, ते कसे चालते? बड्यांना माफ व सामान्यांवर कारवाई करणार असाल तर काही उपयोग नाही असे सांगत सुनील कदम बैठकीतून निघून गेले.
कदम, प्रा. पाटील यांनी कारवाईबाबत जोरदार टीका केली. त्यांनी नोटीस न देता राजकीय आकसाने कारवाई केली असून, महापूर, बावडा येथील कचऱ्याचा प्रश्न ज्वलंत असताना त्याकडे दुर्लक्ष करून विनाकारण कारवाई केली जात आहे. अतिक्रमण काढण्यासाठी विरोध नाही; पण ते नगररचनाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने वाढले आहे. ते हप्ते घेत असल्याने मोठ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला.
अनेकांनी पावसाचे पाणी दुकानात शिरू नये म्हणून उंचीचे कट्टे बांधले. अनेकांनी पावसापासून संरक्षणासाठी शेड मारले. ते तोडली आहेत. अतिक्रमण काढण्याबाबत बैठकीत एक सांगितले जाते व केले जाते दुसरेच याला विरोध असल्याचेही सांगितले. कायद्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. तसेच बंदिस्त पार्किंग खुली करण्यासाठी ९० जणांची यादी तयार आहे. त्यांची नोटीस प्रक्रिया झाली असताना कारवाई केलेली नाही. ती कारवाई थांबवावी यासाठी ही राजकीय चाल असल्याचा आरोप बाबा इंदूलकर यांनी केला. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणासाठी नोटीस न देता महापालिका कारवाई करू शकते असे सांगितले. यावेळी रहिवाशी मिळकतींवर कारवाई करू नका, अशी मागणी केली.
चौकट
...तर शिस्तभंगाची कारवाई
प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘‘बंदिस्त पार्किंग खुले करण्यासाठी पूर्वीपासून कारवाई सुरू आहे. काहींवर कारवाई केली. केवळ राजारामपुरी नव्हे तर शाहूपुरी, लक्ष्मीपुरीत ही कारवाई केली जाणार आहे. कारवाईत दुजाभाव झाला असेल तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. सर्वांना समान नियम लागू राहणार आहे. नियोजनानुसार कारवाई सुरू आहे. अतिक्रमण असेल ते काढले जाईल.’’