खरीपपूर्व मशागत कामांना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीपपूर्व मशागत कामांना वेग
खरीपपूर्व मशागत कामांना वेग

खरीपपूर्व मशागत कामांना वेग

sakal_logo
By

23011
गडहिंग्लज : मॉन्सूनचे आगमन लवकर होण्याच्या शक्यतेने शेतकरी खरीपपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. भैरी रोडवरील शिवारात नांगरट व सडे वेचतानाचे चित्र. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

खरीपपूर्व मशागत कामांना वेग
गडहिंग्लज तालुका; मॉन्सूनच्या लवकर आगमनाच्या शक्यतेने धांदल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : यंदा मॉन्सून लवकर आगमन होण्याच्या शक्यतेने खरीपपूर्व मशागत कामांना वेग आला आहे. पेरणीसाठी शेतजमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. यामुळे शिवारात शेतकरी, मजुरांची वर्दळ वाढली आहे.
तालुक्यात सोयाबीन, भात, भुईमूग या प्रमुख पिकांची पेरणी दरवर्षी होत असते. मे अखेरीस महागाव पट्ट्यात धूळवाफ पेरण्या होतात. त्यासाठी जमिनी तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे. दरम्यान, हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधीच होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. जमीन नांगरणे, सपाटीकरण, सडे वेचणे, बांधबंदीस्ती घालणे आदी कामे उरकून घेण्याच्या गडबडीत शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबासह बाहेरून मजूर आणून ही कामे करुन घेतली जात आहेत. तातडीने काम होण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट केली जात आहे. सडे वेचून जमीन स्वच्छ करून ठेवली जात आहे. मान्सूनचा पाऊस सुरु झाल्यानंतर लगेचच पेरणी करण्याच्या हेतूने तातडीने जमीन तयार करण्याच्या कामात शेतकरी मग्न आहे. एकाचवेळी सर्वत्र खरीपपूर्व मशागतीची कामे सुरु झाल्याने मजूर टंचाईचा प्रश्‍न उद्भवला आहे. त्यातूनही मार्ग काढत शेतकरी जमीन तयार करण्यासाठी गतीने हालचाली करतानाचे चित्र शिवारामध्ये पहायला मिळत आहे.
दरम्यान, खरिपाच्या तयारीत कृषी विभागही सक्रिय झाला आहे. खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना मेळाव्याद्वारे मार्गदर्शन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविली जात आहेत. हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचे प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले जात आहे. शेती सेवा केंद्रांमध्ये हळूहळू भात, सोयाबीन, खरीप ज्वारीची बियाणे दाखल होत आहेत. धूळवाफ पेरणीच्या शेतकऱ्यांकडून भात बियाणे खरेदी करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59723 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top