अपघातात दोघे गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात दोघे गंभीर
अपघातात दोघे गंभीर

अपघातात दोघे गंभीर

sakal_logo
By

मोटारसायकलींच्या
धडकेत दोघे गंभीर
आजरा रोडवर अपघात; एकावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : शहरातील आजरा रोडवर दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या धडकेत दोघे गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे. बुधवारी (ता. १८) रात्री सव्वा दहाच्या सुमारास अपघात झाला. अवधूत आनंदा पाटील (अत्याळ, ता. गडहिंग्लज) व किरण बाळासाहेब रावळ (गडहिंग्लज) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. अनूज राजेश बोरगावे किरकोळ जखमी झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, गडहिंग्लज-आजरा रोडवर सेवा सदन हॉस्पिटलसमोर अवधूत पाटील मोटारसायकलीने आपल्या गावी अत्याळकडे जात होते. त्यावेळी समोरून मोटारसायकलने येणाऱ्या रावळने त्यांना जोराची धडक दिली. त्यात रावळ व पाटील दोघेही गंभीर जखमी झाले. रावळच्या मोटारसायकलवर मागे असलेला अनूज किरकोळ जखमी झाला आहे. दोन्ही मोटरसायकलींचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हयगयीने व निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून स्वत:सह तिघांच्या जखमीला कारणीभूत ठरल्याबद्दल रावळ विरुद्ध पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार रवींद्र जाधव यांनी अपघाताची फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.


२३०३७

शिंदेवाडीतील महिलेचा
विजेच्या धक्क्याने मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : शिंदेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे विजेचा धक्का बसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. सौ. योगिता संदीप कदम (वय ३८) असे मृताचे नाव आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, घराजवळच्या लोखंडी अँगलला कुत्रा बांधला होता. कुत्र्याच्या गळ्यातील चामडी पट्ट्याला लोखंडी साखळी लावली होती. दरम्यान, आज सकाळी हा कुत्रा सारखा भुंकू लागल्याने त्याला सोडण्यासाठी योगिता गेल्या. कुत्र्याला सोडल्यानंतर त्याची लोखंडी साखळी योगिता यांच्या हातात राहिली आणि त्यांना अचानक विजेचा जोराचा धक्का बसला. ही घटना लक्षात आल्यानंतर तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची फिर्याद प्रकाश कदम यांनी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार पाटील करीत आहेत. मृत योगिता यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, योगितावर अचानक काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.