
प्लास्टिक सिंगल युज बैठक
सिंगल युज प्लॉस्टिकची साठवणुकीवर कारवाई करा
जिल्हाधिकारी राहूल रेखावार; बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता.19 : सिंगल युज प्लॉस्टिक वापरावर बंदी घातली असून, सिंगल युज प्लॉस्टिक वापर रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करा, सिंगल युज प्लॉस्टिक साठवूक, विक्री होत असल्यास संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सिंगल युज प्लॉस्टिक संदर्भात आयोजित बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, जे. एस. साळुंखे , प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, सिंगल युज प्लॉस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असून, याबाबत केंद्र सरकार व राज्य शासनाने सूचना जारी केल्या आहेत. महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेने सिंगल युज प्लॉस्टिक वापर, विक्री रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. ज्या ठिकाणी सिंगल युज प्लॉस्टिकचा साठा आहे, विक्री होत आहे अशा ठिकाणची तपासणी करुन साठा जप्त करावा. सिंगल युज प्लॉस्टिकचा साठा व विक्री पुन्हा वापर होणार नाही याबाबत संबधिताना कडक सूचना द्याव्यात. दुसऱ्यांदा त्यांच्याकडून कायद्याचे पालन न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी.
सिंगल युज प्लॉस्टिकची किरकोळ, घाऊक विक्री करणाऱ्यांची यादी संबंधित यंत्रणांना पाठविण्यात आली असून त्यानुसार यंत्रणांनी तपास करुन अहवाल सादर करावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी माने यांनी बैठकीत सांगितले.