
जिल्हाधिकारी आवाहन - विधवा निर्णय
विधवांना सन्मान देण्याचा
हेरवाडचा निर्णय स्वागतार्ह
जिल्हाधिकारी रेखावार; निर्णयाची अंमलबजावणी लोकराजास आदरांजली
कोल्हापूर, ता. १९ : विधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचा हेरवाड ग्रामपंचायतीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे. सर्व ग्रामपंचायतींकडून या निर्णयाची अंमलबजावणी आवश्यक हीच लोकराजाला आदरांजली ठरेल, असाही विश्वास त्यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य व त्यांचे विचार यांचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक क्रांतिकारी बदल समाजात घडवून आणले. विधवा पुनर्विवाह, विधवांना समाजात समान स्थान मिळवून देणे, मुलींसाठी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा. हे सर्व कायदे त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केले होते. जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात अवलंबण्यात आले. याच विचाराने प्रेरित होऊन जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ठराव करून विधवांना समानता देण्याचा निर्णय घेतला. त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आज याच निर्णयाचे स्वागत होत आहे.
शासनाने विधवा प्रथाबंदीच्या या निर्णयाबाबत आपापल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी शासन परिपत्रक काढून आवाहन केले आहे. राज्यात जर याची अंमलबजावणी झाली तर ही खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली ठरेल, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.