
माथाडी मजुरीवाढ निर्णय
23063
अखेर माथाडींना मजुरी वाढ
अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य; १ एप्रिलपासून फरकासह देणार
इचलकरंजी, ता. १९ ः माथाडी कामगारांची अनेक दिवसांपासून सुरू असलेली मजुरी वाढीची मागणी अखेर मान्य करण्यात आली. गुरुवारी कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्यासमोर झालेल्या बैठकीत ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने मजुरी वाढ देण्याचे मान्य केल्याने कामगारांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
बैठकीमध्ये कापड गाठीस प्रती टन २२ रुपये लेव्हीसह वाढ, सूट बाचकी नगास ४.५० पैसे हमाली, वारणी सहा चाकी गाडीस २००, दहा चाकीस ३०० रुपये तर बारा चाकी गाडीस बाचक्याप्रमाणे दर ठरवले. ही वाढ १ एप्रिलपासून फरकासह देण्याचे ठरले असून तसा करारही लवकरच करण्यात येणार आहे. सूत बचकी आणि कापड गाठी यांचे वजन ५० किलोपर्यंत करण्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले.
इचलकरंजीतील माथाडी कामगार व ट्रान्स्पोर्ट असोसिएशनमध्ये मजुरीबाबत केलेल्या कराराची मुदत ३१ मार्चला संपुष्टात आली आहे. करार संपून दीड महिना झाला असताना ठोस निर्णय होत नसल्याने माथाडी कामगारांनी काम बंद केले होते. या वेळी १२ मे रोजी सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये बैठक बोलावली होती. या वेळी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने माथाडी कामगारांनी काम सुरू केल्याशिवाय मजुरी वाढीबाबत निर्णय नाही, अशी भूमिका घेतल्याने बैठक निष्फळ ठरली होती. आज पुन्हा बैठक झाली. सुरुवातीस मजुरी वाढीबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान माथाडी कामगार प्रतिनिधी व ट्रान्सपोर्ट असोसिएशन पदाधिकाऱ्मध्ये वादावादी झाली. मात्र कामगार आयुक्त गुरव यांनी मध्यस्थी करीत सुवर्ण मध्य काढत वाद मिटवला. बैठकीस माथाडी निरीक्षक एस. बी. पुरीबुवा, दीपक पाटील, शामराव कुलकर्णी, धोंडिराम जावळे, अशोक शिंदे, जितेंद्र जाणवेकर, रामचंद्र जगताप, शांताराम लाखे, गंगाधर पाटील उपस्थित होते.
--------
चहा, पाणीवरुण तणाव
माथाडी कामगारांना मजुरी वाढ जाहीर केल्यानंतर ट्रान्सपोर्ट असोसिएशनमधील काही सदस्यांनी कामगारांना चहा, पाणी देणार नाही अशी भूमिका घेतली. तसे प्रोसेडिंगमध्ये नमूद करण्याचा आग्रह धरला. सहायक कामगार आयुक्त गुरव यांनी अशा मागण्या शासकीय नोंदीमध्ये लिहिता येत नसल्याचे स्पष्ट केले. यावरूनही थोडासा तणाव निर्माण झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59804 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..