
महाव्दार रोड व्यापारी असोसिएशन
२३०९०
महाव्दार रोड कोल्हापूरचे भूषण
ललित गांधी; व्यापारी व रहिवासी असोसिएशनतर्फे अनोखा कृतज्ञता सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः समाजातील सर्वच घटकांना सामावून घेणारा महाव्दार रोड कोल्हापूरचे भूषण आहे. याच रोडवर मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली आणि पुढे विविध व्यवसायात आलो. सध्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष असलो तरी मी महाव्दार रोडवरचा एक घटक असल्याचा अभिमान नक्कीच आहे, असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केले. निमित्त होते, महाव्दार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनतर्फे आयोजित सन्मानपत्र वितरण सोहळ्याचे. या परिसराचा लौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींचा या कार्यक्रमात सन्मान झाला. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शामराव जोशी होते.
‘काय काय आलंय बगा...’, ‘घेता का इस्कटू’ असा गलका महाव्दार रोडवर हमखास अनुभवायला मिळतो. त्याच्याही पलीकडे अनेक मोठी शोरूम्स आता इथे उभी राहिली आहे. इथले काही फेरीवालेही प्रत्येक वर्षी न चुकता आयकर भरतात. एकूणच या रोडच्या अवती भवतीचा परिसर म्हणजे कोल्हापूरची प्रमुख बाजारपेठ. दहा ते बारा हजारांहून अधिक कुटुंबांची उदरनिर्वाह याच बाजारपेठेवर अवलंबून आहे. साहजिकच याच महाव्दार रोडप्रती या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त झाली. श्री. गांधी यांच्यासह कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांच्या हस्ते सत्कार झाले.
तृषाशांती कोल्र्डिक हाऊसचे भगवानराव पोवार, लाटकर पंचांग कर्ते मेघःश्याम लाटकर, करवीर क्रिएशन्सचे ग्यानचंद नैनवाणी, प्रफुल्ल जोशी, पुष्पम चिल्र्डेन वेअरचे कांतिलाल निसर, ॲड. पी. बी. नरवणकर, प्रज्ञा क्लासेसचे रविचंद्र निगवेकर, वणकुद्रे भांडी दुकानचे सुरेश वणकुद्रे, कटके परफ्युमर्सचे शरद कटके, ड्रेसलॅंडचे पीयुष सज्ञा, शेटे ॲंड सन्सचे विलास शेटे आदींचा कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन गौरव झाला. असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश उरसाल यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी प्रास्ताविक केले. सचिव डॉ. गुरूदत्त म्हाडगुत यांनी आभार मानले.
महाद्वारने दिली प्रतिष्ठा
सत्कारमूर्तींच्या वतीने भगवानराव पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘महाव्दार रोडवर विविध व्यवसाय करून अनेकांचा केवळ उदरनिर्वाहच चालतो असे नव्हे तर या रोडने आम्हा सर्वांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. घरातल्याच सत्काराने आता आणखी बळ मिळाले आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59842 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..