
मुंबईत घरे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही : दिघे
23100
मुंबईत घरे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही
अतुल दिघे; आजऱ्यात मोर्चाने तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १९ : मुंबईच्या बाहेर घरे द्या याबाबत काही संघटना शासनाकडे आग्रही आहेत. पण हे चुकीचे आहे. गिरणीकामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत. ती मिळवल्या खेरीज आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा सर्व श्रमिक संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिला.
येथील किसान भवन येथे सर्व श्रमिकतर्फे गिरणी कामगारांचा मेळावा झाला. या वेळी दिघे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चाने जावून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारले. या वेळी सर्व श्रमिकचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, पदमजा पिळणकर, गणपत ढोणुक्षे, नारायण भंडागे, पेन्शर्स संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सचिव आप्पा कुलकर्णी यांची भाषणे झाली.
दिघे म्हणाले, ‘‘गिरणी कामगारांनी मुंबई उभारण्यासाठी आपले रक्त आटवले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गिरणी कामगार पुढे होते. ते हुतात्माही झाले आहेत. अशा गिरणीकामगारांना देशोधडीला लावण्याचे काम काही संघटना करीत आहेत. ते आमही करू देणार नाही. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे घेवू. गिरणी कामगारांना बाहेर गावी पाठवल्यास जोडो मारो आंदोलन करू.’’ पाटील म्हणाले, ‘‘गिरणी कामगार घरांसाठी गेली अनेक वर्ष लढत आहेत. पण त्यांना राजकीय नेते केवळ आश्वासने देत आहेत.’’ कुलकर्णी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने पेन्शन बाबत वेळकाढू पणाचे धोरण घेतले आहे. ही केवळ फसवणुक आहे.’’ या वेळी दौलती राणे, हिंदुराव कांबळे, धोंडीबा कांबळे, शांताराम हरेर, नेवरेकर यासह गिरणी कामगार उपस्थित होते.