
बटाट्याच्या आंतरपिकातून ६० हजार उत्पन्न
लोगो ः शेतीतील वेगळ्या वाटा (टुडे १ वरून घेणे)
-----
23141
------
23142
------------------------------
बटाट्याच्या आंतरपिकातून ६० हजार उत्पन्न
बागिलगे येथील ज्ञानेश्वर पाटील यांचे शेतात विविध प्रयोग यशस्वी
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २० ः हमीभाव आणि आर्थिक चलन मिळवून देणारे पीक म्हणून चार दशकांत ऊस पिकाचे क्षेत्र विस्तारत आहे. विविध पाणी प्रकल्पामुळे त्या त्या भागातील जमीन ओलिताखाली येत असून तेथेही उसालाच प्राधान्य आहे; परंतु हे पीक वर्षातून एकदा उत्पन्न देते. याच शेतातून मधल्या काळात उत्पन्न कसे मिळवायचे याचे उत्तर बागिलगे (ता. चंदगड) येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी शोधले. काही वर्षांपासून ते उसात आंतरपीक म्हणून बटाट्याचे पीक घेतात. यावर्षी एक एकरातून त्यांना बटाट्यापासून ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. उसाच्याच मशागत खर्चात हे पीक येत असल्याने ते जादाचे उत्पन्न असल्याचे ते सांगतात.
जानेवारीत उसाची तोडणी झाल्यावर खोडवे आणि नव्याने लागवड करणाऱ्या ऊस पिकात ते बटाट्याची लागवड करतात. यावर्षी त्यांनी एक एकरातील ऊस पिकात कुपरी ज्योती जातीच्या बियाण्याची लागवड केली होती. उसाची मशागत करावी लागते. पाण्याची पाळी द्यावी लागते. त्याच खर्चात बटाट्याचीही वाढ होते. कोणतीही औषध फवारणी नाही की, रासायनिक खत नाही. साडेतीन महिन्यांत सुमारे ३० क्विंटल बटाट्याचे उत्पादन झाले. बेळगाव बाजारपेठेत प्रति क्विंटल २ हजार रुपये दर मिळाला. ६० हजार रुपयांचे उत्पादन झाले. याच क्षेत्रात ८६०३२ जातीचे ऊस बियाणे असून या वर्षी ७० टन उत्पादन अपेक्षित आहे. उसापासून उत्पादन मिळण्यासाठी जो खर्च करावा लागणार होता त्याच खर्चात बटाट्याचे पीक त्यांना साठ हजार रुपयांचे जादाचे उत्पन्न देऊन जाते. पाटील यांचे असे वेगवेगळे प्रयोग सुरूच असतात. त्यांनी वीस गुंठ्यांत कारली आणि त्यामध्ये मेथीचे आंतरपीक घेतले आहे. त्याशिवाय दहा गुंठ्यांमध्ये दोडक्याचे पीक आहे. आणखी पंचवीस दिवसांनंतर कारल्याच्या उत्पादनाला सुरवात होईल. पुढे दीड महिना त्यांना हे उत्पादन मिळणार आहे. शेणखत, प्रेसमड आणि मजुरी मिळून सुमारे पंधरा हजार रुपये खर्च झाला असून त्यातून ७० हजार रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. मेथीपासून आणखी पंधरा दिवसांनी २५ ते ३० हजारांचे उत्पादन मिळेल, तर दोडक्यापासून २० हजारांचे उत्पादन अपेक्षित आहे. दोडक्यासाठी २५० रुपयांचे बियाणे खरेदी केले. त्याव्यतिरिक्त कोणताही खर्च न करता हे उत्पादन मिळणार आहे.
(क्रमशः)
-------------
बाजारपेठेचा अंदाज घेऊन आधुनिक पध्दतीने शेती केल्यास ती नफ्याची होते. वीस वर्षांपूर्वी शेतीमध्ये लक्ष घातले. आताची आमची कौटुंबिक प्रगती केवळ शेतीवरच झाली आहे.
- ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59911 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..