
शिरोळ : विधवा वहिणीबरोबर विवाह
२३३१४
विधवा वहिनीशी केला विवाह
शिरोळमधील मेस्त्री कुटुंबीयांचा आदर्श; पुरोगामी विचारांचा आणखी एक पायंडा
शिरोळ, ता. २० ः विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी पुरोगामी विचारांच्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने विधवा महिलांच्या रूढी परंपरांना छेद देत विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. ही घटना ताजी असताना पुरोगामी विचारांची जोपासना करणाऱ्या येथील मेस्त्री घराण्यातील युवकाने विधवा सख्ख्या वहिनीबरोबर विवाह करून विधवा वहिनीस सौभाग्याचे दान देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
येथील स्व. युसूफसो रसूलसो मेस्त्री दत्त साखर कारखान्याचे ३५ वर्षे संचालक होते. सरपंच ते संचालक प्रवासात पुरोगामी विचारसरणी मेस्त्री कुटुंबाने जपली आहे. युसूफसो यांच्या निधनानंतर त्यांचे नातू अंजुम रहिम मेस्त्री यांना दत्त साखर कारखान्याच्या संचालकपदी संधी दिली. दरम्यान, अंजुम यांचा विवाह सानिया मौला शेख यांच्याशी झाला. अंजुम व सानिया दापंत्याला मुलगा झाला. तथापि अल्पावधीतच अंजुम यांचे आजाराने निधन झाले.
तीन महिन्यांचा मुलगा असताना अंजुम यांचे निधन झाल्याने त्यांची पत्नी सानिया यांच्यावर डोंगर कोसळला होता. मेस्त्री यांचे कुटुंब सधन असले तरी ऐन तारुण्यात पतीच्या निधनाने सानिया खचली होती. अंजुम यांचा भाऊ मंजूर याला भावाच्या निधनाचे दुःख झालेच होते. तथापि, लहान बाळाचे भविष्य कसे घडणार व विधवा वहिनीला समाजातील रुढी परंपरेस सामोरे जाताना अनेक यातना भोगाव्या लागणार याचे चित्र समोर दिसत होते.
मंजूर याने विधवा वहिनीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, वडील रहिम, आई जहॉराअली, वहिनीचे वडील मौला शेख यांच्याशी सल्लामसलत करून विवाह करण्यावर शिक्कामोर्तब केले. १८ मे रोजी सायंकाळी मुस्लिम रिवाजाप्रमाणे विवाह सोहळा झाला.
मंजूर मेस्त्री यांचा आदर्श
पुरोगामी विचारांची कास असणाऱ्या मेस्त्री कुटुंबाने विधवेला केवळ सन्मानाची वागणूक न देता गळ्यात मंगळसूत्र घालून सौभाग्याचे लेणं देऊन खऱ्या अर्थाने समाजापुढे मंजूर मेस्त्री यांनी आदर्श निर्माण केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60096 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..